पुसेगाव – लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे पुण्या-मुंबईसह इतर शहरांमध्ये, तसेच राज्यांमध्ये नोकरी, व्यवसायासाठी असणारे लोक आता गावाकडे येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे स्वतच्या चारचाकी वाहनांसह खासगी बसेसने येणारे हे लोक खरेदीसाठी बाजारपेठेत थांबत आहेत. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भावाची शक्यता निर्माण झाल्याने पाच दिवस पुसेगाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
सध्या मुंबई-पुण्याबरोबरच अन्य भागातून लोकांचे लोंढे फोर व्हीलरने तसेच लक्झरीने आपल्या घरी परतू लागले आहेत. घरी जात असताना पुसेगाव बाजरपेठेत खरेदी करण्यासाठी हे लोक मोठ्या संख्येने येथे थांबत आहेत. करोना प्रसाराच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा असल्याने येथे आठवडाभरासाठीचा असलेला लॉकडाऊन येथील स्थानिक प्रशासनाने 17 मे पासून थोड्याप्रमाणात शिथील केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी पुन्हा पाच दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. याबाबत सरपंच मनिषा पाटोळे व उपसरपंच चंद्रकांत जाधव यांनी सांगितले, शासन व प्रशासन तर आपल्या पध्दतीने आपली काळजी घेतंय, पण बाहेरगावच्या लोकांचे येथे थांबणारे लोंढे पाहता सद्य स्थितीत आपणच आपली काळजी घेण्यात खरा शहाणपणा आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बाहेरगावाहून येणाऱ्या अनेक गाड्या येथे थांबत आहेत. या वाहनांमधून आलेल्या लोकांनी कपडे, भांडी व स्टेशनरी दुकानात खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. या शिवाय पुसेगाव परिसरातील लोकांनी मोठ्या संख्येने स्वतःची गावे लॉकडाऊन करुन स्वतःच्या वाहनांनी पुसेगाव बाजारपेठेकडे धाव घेतली आहे. अजूनही वडूज परिसराबरोबरच कोरेगाव व माण तालुक्यातील लोकांनीही खरेदीसाठी पुसेगाव बाजारपेठेचीच वाट धरल्याने बाजारपेठेतील दुकांनासमोर दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी गर्दी झाली होती.
जोपर्यंत बाहेरगावचे लोक आपल्या गावी परतण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही तसेच आजूबाजूच्या गावांमधील लॉकडाऊन शिथिल होऊन तेथील स्थानिक दुकाने सुरु होत नाहीत तोपर्यंत येथील लॉकडाऊन शिथिल करायचा किंवा नाही? याबाबत विचार करावा लागेल? अशी येथील नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे. दरम्यान या पाच दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत मेडिकल्स, दवाखाने, भाजीपाला विक्री, कृषी सेवा केंद्र व किराणा दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद राहणार आहेत.