पुणे – सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या जगातील दहा शहरांमध्ये पुणे आणि बंगळुरूचा समावेश यंदाही कायम आहे. अरुंद रस्ते आणि वाढती वाहन संख्या हे मुद्दे सर्वत्र समान असल्याचे टॉमटॉम या आंतरराष्ट्रीय संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे. मागील काही वर्षांमध्ये पुणे शहर आणि परिसरात उद्योगव्यवसाय वाढीस लागले, तसे मुलभूत सुविधांचेही प्रश्न वाढत आहेत. यात सर्वाधिक भेडसावणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी.
विशेषत: गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळी आणि सायंकाळी या कोंडीत भर पडते. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावतो आणि कोंडी वाढत जाते. पर्यायाने इंधन, वेळेचे नुकसान सहन करावे लागते. यामुळे वाहनचालकांच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढत असल्याचे निरीक्षण यापूर्वीदेखील नोंदवण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या, शहरभर सुरू असलेली विविध विकासकामे यामुळे वाहनांच्या वेगात अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान, या अहवालानुसार वाहतूक कोंडीच्या जागतिक क्रमवारीत दिल्ली ४४, तर मुंबई ५४ व्या स्थानावर आहे.
दरम्यान, जागतिक पातळीवर लंडन हे जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या शहरामध्ये अव्वल स्थानावर आहे. तेथे गर्दीच्या वेळी वाहतुकीचा सरासरी वेग 14 किमी प्रतितास वेग नोंदवला आहे.
शहर आणि दहा कि.मी. प्रवासासाठी
लागणारा सरासरी वेळ (मिनिटे/सेकंद)
लंडन (इंग्लंड) – 37.20
डब्लिन (आयर्लंड) – 29.30
टोरोंटो (कॅनडा) – 29.००
मिलान (इटली) – 28.50
लिमा (पेरू) 28.30
बंगळुरू (भारत) – 28.10
पुणे (भारत) – 27.50
बुकारेस्ट (रोमानिया ) 27.40
मनिला (फिलिपाइन्स ) 27.20
ब्रुसेल्स (बेल्जियम) – 27.००