पुणे – नांदेड सिटीतील नागरिकांना महापालिकेकडून या वर्षीपासून मिळकतकर आकारण्यात आला आहे. मात्र, अद्यापही अनेक नागरिकांना महापालिकेची मिळकतकराची बिले मिळालेली नसल्याने नांदेड सिटीतील रहिवाशांना पीटी ३ अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत पुढील आठवड्यात आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊन घेण्याचे आश्वासन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. कुणाल खेमनार यांनी दिले आहे.
मिळकतकर आकरणीबाबत नांदेड सिटीमधील नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आमदार भिमराव तापकीर, भाजपचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष सचिन मोरे, तसेच आसावरी सोसायटीचे अध्यक्ष रूपेश घुले यांच्यासह नांदेड सिटीमधील रहिवाशांनी खेमणार यांची भेट घेत मागण्याचे निवेदन दिले. त्यावर सकारात्मक भूमिका घेत या प्रकरणी सुनावणी घेण्याचे आश्वासनही यावेळी महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असल्याचे रूपेश घुले यांनी स्पष्ट केले.
मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवणार
महापालिकेकडून नांदेड सिटीतील रहिवाशांना मिळकतकराची बिले देण्यात आलेली असली तरी ४० टक्के सवलत देण्यात आलेली नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. तसेच, निवासी मिळकतींना ही सवलत मिळावी यासाठी महापालिकेने पीटी ३ अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली असली तरी अद्यापही अनेक नागरिकांनी ही बिलेच मिळालेली नसल्याने ही मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यास, महापालिका प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आली असून पुढील आठवड्यात महापालिका आयुक्तांशी चर्चा करून याबाबत प्रस्ताव ठेवण्याचे आश्वासन डाॅ खेमनार यांनी शिष्टमंडळास दिले आहे.
या आहेत ना प्रमुख मागण्या व प्रश्न
– नागरिकांची हरकत घेऊनच २३ गावांप्रमाणे कर आकारणी करावी.
– कोणते कर आणि का घेतले जाणार याचा खुलासा करावा.
– टाऊनशिप असल्याने दुप्पट कर घेऊ नये.
– पाणीपट्टी आकारू नये .
– २०२९ नंतर १०० टक्के कर भरावा लागणार का ?
– ज्या वर्षी भोगवटा पत्र त्या वर्षाप्रमाणे कर आकारावा.
– तक्रार निवारण प्रणाली सुरू करावी.
– पीटी ३ अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी.
– पीटी ३ अर्जा सोबतची कागदपत्रे कमी करावीत.
– म्हाडा सदनिकांमधील नागरिकांना हप्त्यात कर भरण्याची सुविधा द्यावी.
– सोलर, एसटीपी, कचरा प्रकल्पाचीही सवलत मिळावी .
“नागरिकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल. पीटी ३ अर्जाबाबत सोमवारी महापालिका आयुक्तांशी चर्चा करून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेतला जाईल. नागरिकांच्या मागण्यांबाबत कर संकलन विभागासही सूचना देण्यात आल्या आहेत.-” डाॅ.कुणाल खेमनार, अतिरिक्त महापालिका आयुक्त