पुणे –निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी महापालिका निवडणूक विभागाने पालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांची तातडीची बैठक येत्या गुरूवारी बोलविली आहे. या बैठकीत निवडणुकांच्या नियोजनावर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन पुढील महिन्यात दीड महिन्यांत केव्हाही निवडणुका जाहीर होतील, हे गृहीत धरूनच कामाला लागले असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यायालयाच्या आदेशाला आठवडा झाला असतानाच आयोगानेया निवडणूक कार्यक्रमाला गती दिली आहे. त्यामुळे आयोगाला याच गतीने निवडणुका घ्यायच्या झाल्यास महापालिकेस एक ते दीड महिन्यांचाच कालावधी नियोजनासाठी मिळेल अशी शक्यता आहे. त्यामुळे मतदार याद्या, निवडणूक कार्यालये, मनुष्यबळ, संगणक यंत्रणा, निवडणूक साहित्य, निवडणूक कर्मचारी, निवडणूक प्रशिक्षण तसेच संबंधित इतर सर्व घटकांवर नियोजन अंतिम करण्यासाठी विभाग प्रमुख यशवंत माने यांनी ही बैठक बोलाविली आहे.
…म्हूणन प्रशासनाची तयारी
आयोगाने निवडणुकीच्या तारखांबाबत काही ठोस जाहीर केलेले नसले, तरी पावसाळ्यात निवडणुका घेता येणार नाहीत अशीच आयोगाची भूमिका आहे. मात्र, न्यायालयाने निर्णय दिल्यास आयोगास निवडणुका घ्याव्याच लागतील. त्यामुळे ऐनवेळी निवडणुका झाल्यास पालिकेस तयारीसाठी वेळ मिळणार नाही. त्यामुळे निवडणुका जुलैमध्ये होवो, अथवा पावसाळ्यानंतर. पालिका प्रशासन मात्र तयारीस लागले आहे.