खर्च कोटीचा; फायदा अडीच लाखांचा, माहिती अधिकारात बाब उघड
पुणे – संचलन तुटीपोटी दरवर्षी महापालिकेकडून अडीचशे ते तीनशे कोटींचा निधी मिळवून हे पैसे “पीएमपी’ने चक्क हवेत उडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहेत. 2017 मध्ये पीएमपीच्या स्वारगेट येथील डेपोच्या इमारतीवर हवेतून वीज निर्मितीसाठी चार पवनचक्क्या उभारण्यात आल्या होत्या. या कामासाठी 1 कोटी 8 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. त्यानंतर, या पवनचक्क्यांतून अवघी 27 हजार 868 युनिट वीजनिर्मिती झाली आहे. तर त्यातून पीएमपीचे विजेचे 2 लाख 64 हजार 746 रुपये वाचले आहेत. त्यामुळे एक कोटींच्या खर्चातून पीएमपीने अवघा अडीच लाखांचा फायदा मिळविला आहे. या पवनचक्क्याही गेल्या दोन वर्षांपासून बंद असून, त्या आऊटडेटेड झाल्याने त्याचे खराब झालेले भागच मिळ्त नसल्याने त्या बंद आहेत. सिटी आय संस्थेचे संजय शितोळे यांनी पीएमपीकडे विचारलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे.
शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी पीएमपीकडे आहे. मात्र पीएमपीच्या स्थापनेपासून ही कंपनी आर्थिक तोट्यातच आहे. त्यामुळे तत्कालीन राज्य शासनाने पीएमपीची संचलन तूट पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही तूट जवळपास सहाशे कोटींच्या घरात गेली असून, एकटी पुणे महापालिका वर्षाला पीएमपीला साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये मोजत आहे. अशा स्थितीत या निधीचे योग्य नियोजन करणे आवश्यक असताना पीएमपीकडून चक्क पवनचक्कीसारख्या कामांवर असा खर्च केला जात असल्याने महापालिकेच्या पैशाची ही सरळ सरळ उधळपट्टी असून, अशा अनावश्यक खर्चाला लगाम घालणे आवश्यक बनले आहे.
या पवनचक्क्या 2017 मध्ये बसविण्यात आल्या होत्या. त्यासाठी 1 कोटी 8 लाखांचा खर्च पीएमपीने केला असल्याची माहिती मला देण्यात आली आहे. सद्यःस्थितीत या चारही पवनचक्क्या नादुरुस्त असून, त्यातून 0 युनिट वीज उत्पादित होते. त्या केव्हापासून बंद आहेत, याची कोणतीही माहिती पीएमपीकडे नाही. तसेच कधी सुरू होतील, हे सांगण्यात प्रशासन तयार नाही. दुरुस्तीसाठी ठेकेदाराला स्पेअरपार्ट मिळत नाहीत, असे उत्तर देण्यात येत आहे.
– संजय शितोळे, सीटी आय संस्था