पुणे – पुणे महानगर परिहवहन महामंडळाने ऍपद्वारे पेमेंट स्विकारण्याच्या निर्णयानंतर आता ऑनलाइन तिकीट देण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी ऍप निर्मितीचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे लवकरच ऑनलाइन पेमेंट, तिकीट आणि मार्गांची माहिती पुणेकरांना पीएमपीच्या ऍपद्वारे मिळणार आहे.
देशात डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत विविध सुविधा ऑनलान पद्धतीने दिल्या जात आहेत. पीएमपी प्रशासनाने देखील काही सुविधा ऑनलाइन पद्धतीने देण्यासाठी पाऊले उचलली असून, यासाठीचे काम सुरू केले आहे. काही दिवसांपुर्वीच पीएमपी प्रशासनाने ऑनलाइन पेमेंट ऍपच्या माध्यमातून तिकीटाचे पैसे स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी पुणे दर्शनच्या दोन बसमध्ये प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू करण्यात येणार आहे. ही सुविधा यशस्वी झाल्यास इतर बसमध्ये लवकरच ही सुविधा सुरू केली जाणार आहे. तसेच पीएमपीचे संकेतस्थळ अद्यावत करून संकेतस्थळाच्या माध्यमातून विविध सुविधा देण्यात येणार आहेत. पीएमपीची आयटीएमएस सुविधा सुरू करण्यासाठी पीएमपी प्रशासन आणि गूगल यांच्यात करार झाला असून, याचे काम देखील प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ही सुविधा सुरू झाल्यास नागरिकांना बसचे लाइव्ह लोकेशन ट्रक करता येणार आहे. तसेच बसची वेळ, मार्ग आणि नंबर ऑनलाइन पद्धतीने चेक करता येणार आहे. पीएमपीच्या या सर्व सुविधा सुरू झाल्यास पुणेकरांना वातानुकुलित सेवेबरोबरच अत्याधुनिक डिजिटल सेवांचा लाभ घेता येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पीएमपीकडून या सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, कर्मचारी संघटनांचा विरोध, आराखडा तयार करण्यास लागणारा उशीर यामुळे डिजिटायझेशन सेवा रखडली होती. त्याचा पीएमपीच्या कामकाजावरही परिणाम होत होता.
पुणेकरांना अत्याधुनिक डिजिटल सुविधा देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांना चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे.
-ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष, पीएमपी