पुणे, दि. 3 – पीएमपी प्रशासनाकडून सात मीटर छोट्या बससाठी 52 रुपये प्रति किलोमीटर भाडेतत्वाचा दर निश्चित करण्यात आला असून 120 किमीचे हमी दिली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका भाडेतत्त्वावर घेणार असलेल्या सात मीटर लांबीच्या 300 ई-बसचे भाडेदर पीएमपी प्रशासनाने महापालिका प्रशासनाला पाठविले आहे परंतु, याबाबत कमी-अधिक, असा “खेळ’ सुरू असून दोन्ही प्रशासनात भाडेदराबाबत अद्याप एकमत झालेले नाही.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका एकत्रित सात मीटर लांबीच्या 300 ई-बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. महापालिकेने सात मीटरच्या बस भाडेतत्त्वावर घेण्यासाठी मागविलेल्या टेंडरमध्ये एकच बस उत्पादक कंपनी सहभागी झाली. त्या कंपनीने प्रतिकिलोमीटर 72 रुपये दर सांगितला आहे. यावर महापालिका प्रशासनाने पीएमपी प्रशासनाला दर निश्चित करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मागील दोन ते तीन महिन्यांपासून ही निविदा प्रक्रिया सुरू आहे. पण, पूर्वीचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा हे सुट्टीवर असल्याने यावर गेले दोन महिने कोणताही निर्णय झाला नव्हता. मात्र, आता नवीन अध्यक्ष ओमप्रकाश बकोरीया यांनी कारभार स्विकारताच प्रलंबीत प्रश्न मार्गी लावण्याचा धडाका लावला आहे. पीएमपी प्रशासनाने गुरूवारी सात मीटर बससाठी 52 रुपये प्रति किलोमीटर दर निश्चित केले आहेत. आता, उत्पादक कंपनी हे दर मान्य करणार का? आणि 300 ई-बस मिळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुण्यात ‘अव्वाच्या सव्वा’ दर
कल्याण-डोंबिवली महापालिकेला 29, नवी मुंबई पालिकेला 27 रुपये प्रतिकिलोमीटर दराने ई-बस भाडेतत्त्वावर मिळाल्या आहेत. पुण्यात 72 रुपये प्रतिकिलोमीटर रुपये असा अव्वाच्या सव्वा दर देण्यात आला.