पुणे –शहरात सर्वसामान्य नागरिक तसेच बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामासाठी काढलेल्या झाडांच्या बदल्यात नवीन लावलेली झाडे तसेच परिसरात नियमानुसार झाडे लावली आहेत का, याचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या नावाखाली उद्यान विभागाकडून नागरिकांची आर्थिक लूट केली होत आहे.
नियम दाखवित 50 हजारांपर्यंत रक्कम उकळली जात असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केला. तसेच याप्रकरणी तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ओसवाल यांनी केली आहे.
ओसवाल म्हणाले की, एखाद्या मोकळ्या प्लॉटमध्ये घर किंवा बंगला बांधल्यानंतर बांधकामाच्या परिसरात झाडे लावणे बंधनकारक आहे. लावण्यात येणाऱ्या झाडांची संख्या, उंची, बुंध्याची जाडी हे प्लॉटच्या आकारानुसार निश्चित केले आहे.
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधित मालकाने ड्रेनेज, पाणी व झाडे लावल्याची एनओसी पालिकेच्या बांधकाम विभागाला सादर केल्यानंतर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. नियमानुसार झाडे न लावल्यास संबंधित मालकाला महापालिकेच्या उद्यान विभागाकडे प्रत्येक झाडासाठी 10 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते.
ही रक्कम भरल्यानंतर वर्षभराने झाडे दाखवून रक्कम परत मिळते. मात्र, हॉर्टिकल्चर मिस्त्री लावलेल्या झाडांमध्ये त्रुटी काढून अनामत रकमेची भीती घालतात. तसेच, एनओसी देण्यासाठी 5 ते 50 हजारांपर्यंत मागणी करत आहेत. त्यामुळे तातडीने अशाप्रकारे नागरिकांची अडवणूक करून लूट करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ओसवाल यांनी केली आहे.