पुणे –राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसी आरक्षणासंबंधी अंतरिम अहवालाचा मसुदा तयार केला आहे. तो अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र, अजूनही या अहवालाचे काम अपूर्ण असून, शनिवारी पुन्हा बैठक होणार आहे. दरम्यान, अंतरिम अहवाल राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे येत्या सोमवारी (दि.7) सादर केला जाणार आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाची बैठक शासकीय विश्रामगृह येथे झाली. याबैठकीस आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश आनंद निरगुडे हे ऑनलाइन उपस्थित होते. तर आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके, प्रा. गोविंद काळे, निवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, ऍड. बी. एल. सगर-किल्लारीकर, प्रा. नीलिमा लोखंडे, जोतिराम चव्हाण आदि उपस्थित होते. ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवालावर शनिवारी चर्चा करून तयार होईल.
याबाबत आयोगाचे सदस्य ऍड. बी. एल. सगर- किल्लारीकर म्हणाले, “मागासवर्ग आयोगाकडून अहवाल अंतिम करण्याचे काम शनिवारी पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर सोमवारी राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे अहवाल सादर केला जाईल. राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या इतर मागास वर्गाच्या माहितीची छाननी करण्याचे काम सुरू असून, वेळेअभावी शुक्रवारी काम थांबविण्यात आले आहे. शनिवारी सकाळी अकरा वाजल्यानंतर पुन्हा बैठक होणार आहे. उद्या दुपारपर्यंत अहवालाला अंतिम स्वरूप दिले जाईल. त्यानंतर येत्या सोमवारी अहवाल सादर केला जाणार आहे.’