Pune News | पुण्यात लसीकरणाला गती मिळणार; आणखी 86 केंद्र वाढवले

पुणे – लसीकरणासाठी आणखी 86 केंद्र वाढवले असून, आता दोनशेच्या आसपास जाणार आहेत. यामुळे लसीकरणाला गती मिळण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात दररोज एक लाख नागरीकांना लस देण्याचा संकल्प पुणे विभागाने केला आहे. त्यासाठी शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात येत असून, जी लसीकरण केंद्रे महापालिका शाळांच्या शेजारी आहेत, त्या शाळांमध्येही लसीकरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाने 86 केंद्रांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. या सर्व केंद्रांना केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढणार आहे. सध्या शहरात 109 केंद्रांवर लसीकरण केले जाते. त्यामध्ये आता आणखी 86 केंद्रांची भर पडली आहे.

महापालिकेला आता स्वत:च्या जागेत सुरू कराव्या लागणाऱ्या केंद्रांत लसीकरणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्या लागणार असून, क्षेत्रीय कार्यालयांनी त्या उभ्या करायच्या आहेत. या लसीकरण केंद्रांत इंटरनेट, लॅपटॉप किंवा संगणक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, नर्सेस, डॉक्‍टर, रुग्णवाहिका आदी व्यवस्था उभाराव्या लागणार आहेत.

45 वर्षावरील सर्वांना लस देण्यात येत असल्याने मनुष्यबळ वाढवले आहे. लसीकरणासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या लसीकरण केंद्र परिसरातील पालिकेच्या शाळांमध्ये लसीकरणासंबंधी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लवकरच अतिरिक्त मनुष्यबळ आणि व्यवस्था करण्यात येणार आहे.
– डॉ. आशीष भारती, आरोग्य प्रमुख, मनपा

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.