पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याच्यासह तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कोठडीची मुदत संपत असल्याने ललित पाटील, रोहन चौधरी आणि शिवाजी शिंदे यांना सोमवारी (दि.13) न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्या कोठडीत सात दिवस वाढ करण्याचा आदेश मोक्काचे विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी दिला.
टोळीतील आणखी चार सदस्यांची नावे आत्ता समोर आली आहे. त्यामुळे सर्वांची समोरासमोर चौकशी करणे गरजेचे आहे, त्यामुळे सर्वांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी केली. दरम्यान निष्पन्न झालेले सर्व आरोपी सध्या राज्यातील विविध कारागृहात आहेत. त्यांना मंगळवारी (दि.14 ) पुण्यात आणून न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना मोक्कानुसार पुन्हा ताब्यात घेण्यात येत आहे. राज्यातील विविध शहरात मेफेड्रॉन या अमली पदार्थांचे उत्पादन आणि वितरण करण्यासाठी टोळी कार्यरत आहे. अरविंदकुमार लोहरे हा या टोळीचा प्रमुख असून त्याने ललित पाटील याला येरवडा कारागृहात मेफेड्रान बनविण्याचे सूत्र दिले होते, असे आत्तापर्यंतच्या तपासातून निष्पन्न झाले आहे.
नव्याने नावे समोर आलेल्या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक आरोपी असलेल्या शहरात रवाना झाले आहेत. प्रॉडक्शन वॉरंटद्वारे त्यांना मंगळवारी येथील मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्यात अटक असलेले आधीचे आरोपी आणि नव्याने अटक करण्यात येणाऱ्या चौघांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती सरकारी वकील चंद्रकिरण साळवी यांनी दिली.
टोळी प्रमुख व इतर आरोपींनी कशा प्रकारे संगनमत करून मेफेड्रॉनचा कारखाना तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य आणि आर्थिक पाठबळ मिळवले. कारखाना सुरू करून मेफेड्रॉनचे उत्पादन, वाहतूक आणि विक्री केली. मेफेड्रॉन विक्रीतून आलेल्या पैशाचा कशाप्रकारे वापर केला, याबाबत टोळी प्रमुख लोहरे आणि टोळीतील इतर सदस्यांचा समोरासमोर तपास करण्यात येणार आहे.