पुणे – काही वर्षांपूर्वी थैमान घातलेल्या स्वाइन फ्लू हा रोग अजूनही वातावरण बदलले की डोके वर काढतोच. सध्या स्वाइन फ्लू झालेले 281 रुग्ण शहरात आढळले आहेत. त्यामुळे हा रोग नियंत्रणात जरी आला असला, तरी त्याचे उच्चाटन झाले असे म्हणता येणार नाही.
स्वाइन फ्लू अर्थात शास्त्रीय भाषेत “एच1-एन1” या रोगाने 13 वर्षांपूर्वी आरोग्य व्यवस्थेला सळो की पळो केले होते. हिवाळा आणि पावसाळा या संक्रमण काळात प्रामुख्याने या रोगाची लागण झालेले रुग्ण आढळून येतात. ताप, खोकला, सर्दी अशी जरी सामान्यपणे याची लक्षणे असली तरी ती तीव्र स्वरूपाची असतात. यावर “टॅमी फ्लू’ हे औषध जरी उपलब्ध असले आणि त्याची परिणामकता जरी जास्त असली तरी, या रोग झाल्यानंतर त्याचा उपयोग केला जातो.
त्यामुळे या रोगाचे उच्चाटण अद्याप झाले नाही, त्यातून आता नव्याने आलेल्या करोना रोगाची लक्षणेही स्वाइन फ्लू सदृशच असून, ताप, खोकला, सर्दी झाल्यास करोनाची आधी चाचणी केली जाते आणि ती निगेटिव्ह आली असेल तर स्वाइन फ्लूची टेस्ट केली जात आहे.
शहरात स्वाइन फ्लूच्या आढळलेल्या 281 रुग्णांतील 280 जण बरे झाले आहेत. एकावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने या रोगाने मागील वर्षीपासून एकाही रुग्णाचा बळी गेलेला नाही. करोनासाठी जे सुरक्षेचे उपाय आहेत तेच यासाठीही आहेत.
– डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, मनपा
लहान मुले, वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांना धोका
5 वर्षाखालील मुले, 65 वर्षावरील वृद्ध व्यक्ती आणि दमा, हृदयाचे आजार, मूत्रपिंडाचे विकार, मधुमेह, यकृताचे विकार, रक्त अथवा चेतासंस्थेचे विकार असलेले रुग्ण, औषधे/ आजारामुळे प्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्ती, स्टेरॉईडस दीर्घ काळापासून घेणाऱ्या व्यक्ती किंवा एचआयव्ही बाधित रुग्ण, गरोदर माता, स्थूल व्यक्ती अशा कोमॉर्बिड असलेल्या व्यक्तींना याचा संसर्ग लगेचच होऊ शकतो.
अशी घ्या काळजी
या रोगातही संसर्ग होऊ नये म्हणून वारंवार हात स्वच्छ धुणे, विलगीकरण, मास्क वापरणे, पौष्टिक आहार घेणे, पुरेशी झोप, विश्रांती, भरपूर पाणी पिणे, हिरव्या पालेभाज्या, मोसंबी, संत्री, आवळा, लिंबू अशा ई जीवनसत्त्व युक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक
अशी आहेत त्याची लक्षणे
या रोगाचा प्रसार हवेतून होतो. याची लागण झालेल्या व्यक्तीच्या शिंकण्या-खोकण्यातून उडणाऱ्या थुंकीतून या आजाराची लागण होते. याचा कालावधी 1 ते 7 दिवस इतका आहे. त्याची लक्षणे ही ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा हे असून, लहान मुलांमध्ये उलटी, जुलाब ही लक्षणेही आढळतात.
वर्षभरातील स्वाइन फ्लूची आकडेवारी
तपासणी केलेले संशयित रुग्ण 3,490
टॅमी फ्लू औषध दिलेले 2,611
तपासणीसाठी स्वॅब पाठवलेले 2,611
स्वाइन फ्लूचे निदान झालेले 281
बरे झालेले 280
मृत्यू 0