पुणे – मुळा, मुठा नदीकाठ विकसन योजनेला मंजुरी मिळून अवघे दोन दिवस झालेले आहेत. त्याच वेळी या कामांची निविदाही प्रशासनाने तत्काळ जाहीर केली आहे. एका बाजूला शहरातील रस्ते तसेच अत्यावश्यक कामांसाठीच्या निविदा तसेच प्रस्तावांना मान्यता मिळूनही ही कामे अनेक महिने प्रशासकीय मान्यतेत अडकलेली असतात. दुसऱ्या बाजूला मात्र या 4 हजार 765 कोटींच्या कामासाठी प्रशासनास चांगलीच घाई झाल्याचे बोलले जात आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यातील संगम घाट ते बंडगार्डन पूल या टप्प्यातील कामाची सुमारे 360 कोटी रुपये खर्चाच्या कामाची निविदा मागविण्यात आली आहे. त्यात, नदीच्या दोन्ही काठावर पिचिंग करण्यात येणार आहे. तसेच संगमघाट येथे सुशोभीकरण, संगमवाडीच्या बाजूने सायकल ट्रॅक, नाईक बेटाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. भविष्यात नदीपात्रात बोटिंगचेही नियोजन करण्यात येणार आहे. शहरातील नदीकाठ सुधार प्रकल्पास पर्यावरण तज्ज्ञांकडून विरोध होत आहे. तर, महापालिका प्रशासन हा प्रकल्प करण्यावर ठाम असल्याने घाईगडबड कोणासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अशी आहे संपूर्ण योजना
मुळा-मुठा संवर्धनासाठी “जायका’ योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेचे काम अद्याप सुरू झालेले नाही. असे असतानाच प्रशासनाने नदीकाठ विकसन प्रकल्प हाती घेतला आहे. त्या अंतर्गत मुळा आणि मुठा नदीच्या दोन्ही काठांवर जवळपास 44 कि. मी. परिसरातील नदीकाठ सुशोभित करण्यात येणार आहे. 11 टप्प्यांमध्ये करण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी 4 हजार 765 कोटी रुपये खर्च येणार आहे.
योजनेचा उद्देश
नदी स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त करणे, पुराचा धोका कमी करणे, नदीच्या बाजूने सार्वजनिक जागा निर्माण करणे, नदीच्या पाण्याची पातळी टिकवून ठेवणे, नागरिकांना नदीपर्यंत पोहोचता यावे यासाठी सुविधा निर्माण करणे, नदीलगत अस्तित्वात असलेल्या ऐतिहासिक वास्तू, मैदाने, उद्याने आणि नदीकाठ संवर्धन करणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
पहिल्या टप्प्यात हे होणार काम
पहिल्या टप्प्यात सीओईपी ते बंडगार्डन येथील नदीकाठावर पिचिंग करण्यात येणार आहे. तेथेच मध्यभागातून सायकल ट्रॅक करण्यात येणार आहे. हा ट्रॅक थेट बंडगार्डन येथील पुलापर्यंत असेल. पिचिंग केलेल्या भागावर उष्णता वाढू नये यासाठी हिरवळ व शोभेची झाडे लावण्यात येणार आहेत. संगम घाटावरील पुरातन वास्तूला कुठलाही धक्का न लावता या परिसराचे अनुरूप संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. ताडीवाला रस्त्यालगत नदी काठावर संरक्षक भिंतही वेलींनी सुशोभित करण्यात येणार आहेत. नदीपात्रात ठिकठिकाणी नागरिकांना उतरण्यासाठी जागा, तसेच बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण परिसरात एक हजार देशी प्रजातीचे वृक्षही लावण्यात येणार आहेत. पिचिंग केल्याने बंडगार्डन ते संगमघाट परिसरापर्यंत नदीची पातळी पाच ते सहा फूट खोल राहणार आहे.