पुणे – अनैतिक संबंधातून त्रास देणाऱ्या मित्राचा दांडक्याने मारहाण करून तसेच कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी 30 वर्षीय महिलेचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश बी.पी.क्षीरसागर यांनी फेटाळला.
या प्रकरणी सनि उर्फ शन्नु सुदाम गाडे (वय 29), मोहम्मद शरीफहुसेन कुरेशी (वय 23 ) आणि सलीम मुर्तुजा शेख (वय 36, सर्व रा. लोहगाव) यांना अटक केली आहे. सुमित दिलीप जगताप (वय 34, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. लोहगावमधील ब्रम्हदेव नर्सरीजवळ 3 एप्रिल 2021 रोजी रात्रीच्या सुमारास खुनाची घटना घडली होती.
आरोपींनी केलेला गुन्हा गंभिर स्वरूपाचा असून, आरोपी महिलेचा गुन्ह्यांत सक्रीय सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत. तपासादरम्यान, आरोपी महिलेच्या घरझडतीत सापडलेल्या मोबाईलमध्ये चित्रफित आढळून आली आहे. त्यात खुन होण्याच्या पूर्वी दि. 3 एप्रिल रोजी मयत सुमित जगताप, सनी उर्फ शन्नु गाडे, ती महिला, सलीम शेख, मोहम्मद कुरेशी हे लोहगाव जवळील कलवड वस्ती भागात मद्यप्राशन करून नाचत असताना दिसत आहेत.
आरोपी महिलेने मयत सुमित यास प्रथम लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. गुन्हयाचा तपास पूर्ण करून 30 जून 2021 रोजी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. करोना प्रादुर्भावामुळे आरोपींची ओळखपरेड घेण्याची प्रक्रिया पूर्ण करता आलेली नसून ती कार्यवाही पूर्ण करून घेणे बाकी आहे. तिची लोहगाव भागात दहशत आहे. त्यामुळे ती पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली.