पुणे – शहरात महापालिकेकडून हांडेवाडी येथे प्रभू श्री रामांचा पुतळा उभारला जाणार आहे. महापालिकेच्या ऑक्टोबर महिन्याच्या मुख्यसभेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या प्रस्तावास मान्यता दिली. दरम्यान, महापालिकेच्या माध्यमातून उभारला जाणारा हा देशातील पहिला पुतळा असल्याचा दावा केला जात आहे.
हा पुतळा उभारण्यासाठी 2018 मध्ये शिवसेना शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी स्थायी समितीत प्रस्ताव दिला होता. त्यानंतर, मुख्यसभेतही या प्रस्तावास मान्यता देण्यात आल्यानंतर हा प्रस्ताव महापालिकेने शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला होता. शासनाने त्याला हिरवा कंदील दर्शविल्यानंतर या प्रस्तावास मुख्यसभेत मान्यता देण्यात आली आहे.
काय होता प्रस्ताव –
हा पुतळा उभारण्यासाठी 2018 मध्ये नगरसेवक नाना भानगिरे यांनी स्थायी समितीत प्रस्ताव दिला होता. त्यानंतर, मुख्यसभेतही या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. मात्र, नियमानुसार, केवळ महापुरूषांचे पुतळे उभारले जात असल्याने महापालिकेने राज्याच्या नगरविकास विभागाकडे हा प्रस्ताव पाठविला होता. मात्र, तत्कालीन महाविकास आघाडीकडून या प्रस्तावावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. त्यानंतर राज्यात सत्ताबदल होताच, भानगिरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करत नगरविकास विभाग, गृह विभाग तसेच राज्याच्या पोलीस महासंचालकांची मान्यता मिळविल्या आहेत.
त्यानंतर हा प्रस्ताव पुन्हा महापालिका प्रशासनाकडे आल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकत्याच झालेल्या मुख्यसभेत त्यास मान्यता दिली आहे.
या ठरावात प्रभाग क्रमांक 26 हांडेवाडी – कौसरबाग रस्त्यावरील श्रीराम चौकामध्ये प्रभू श्री रामाचे वास्तूशिल्प किंवा पुर्णाकृती पुतळा बसविण्यास मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी उभारला जाणारा हा देशातील पहिलाच पुतळा असणार असल्याचा दावा भानगिरे यांनी केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळेच हे शक्य झाले असल्याचे ते म्हणाले.