पुणे- रेल्वेकडून पुणे-लोणावळा मार्गावरील लोकलच्या प्रवाशांना आता जनरल तिकीट मिळणार आहे. मात्र, यासाठी करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेणे आणि युनिव्हर्सल पास बंधनकारक आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी मार्च महिन्यात रेल्वेच्या प्रवाशांना जनरल तिकीट देण्यात येत नव्हते. ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमध्ये प्रवेश देण्यात येत होता. परंतु, सिझन तिकीट घेवूनच प्रवास करावा लागत होता. यासाठी युनिव्हर्सल पासदेखील बंधनकारक होता. मात्र, मागील काही दिवसांपूर्वी राज्य शासनाने मुंबईत प्रवाशांना जनरल तिकीट उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच धर्तीवर पुणे-लोणावळा लोकलच्या प्रवाशांना जनरल तिकीट देण्यात येणार आहे. सध्या पुणे-लोणावळा-पुणे मार्गावर 16 लोकल धावत आहेत.
लसीचे दोन आणि युनिव्हर्सल पास बंधनकारक करून लोकलमधून प्रवासासाठी एका दिवसाचे म्हणजेच जनरल तिकीट काढता येणार आहे. मात्र, डेमूसह अन्य गाड्यांमध्ये जनरल तिकिटाची सुविधा उपलब्ध नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.