पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या साथीदारास पुणे पोलिसांनी अटक केली. नाशिकमधील मेफेड्रोन कारखाना, अमली पदार्थ विक्रीची जबाबदारी आरोपीकडे होती, मेफेड्रोनचा मुख्य वितरक म्हणूनही कार्यभार संभाळत होता. त्याच्या अटकेने पुढील वितरणाची साखळी निष्पन्न होणार आहे.
रोहन उर्फ गोलू अन्सारी असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मुंबई पोलिसांनी अन्सारीला ठाणे परिसरातून अटक केली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अन्सारी सहआरोपी आहे. अन्सारीचा ताबा पुणे पोलिसांनी घेतला. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीच्या वतीने ऍड. विजय गिड्डे यांनी काम पाहिले.
असा चालायचा कारभार
- नाशकातील मेफेड्रोन कारखान्याची
- जबाबदारी गोलू अन्सारीकडे होती.
- तयार होणारा माल अन्सारी मुंबईत न्यायचा
- तेथून हा माल देशभर तसेच परदेशांत जायचा
- यातून मिळणारे पैसे अन्सारी हा
- ललित आणि भूषणकडे द्यायचा
मौजमजा, ऐषोराम अन् उंची राहणीमान
ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नुकतीच अटक करण्यात आली. यात व्यवसायाने वकील असलेल्या मैत्रिणीने ड्रग्ज विक्रीतून आलिशान कार आणि मोबाइल खरेदी केला. ललित ससून रुग्णालयात असताना तिला भेटण्यासाठी तसेच ड्रग्जचे डील करण्यासाठी हॉटेल लेमन ट्रीमध्ये येत होता. त्याची दुसरी मैत्रीणही अनेकदा भेटायला आली होती. मात्र, ती दुसऱ्या हॉटेलमध्ये उतरत होती.
दोघींनाही एकमेकींविषयी माहिती होती. मात्र, ललितकडून हवा तेवढा पैसा मिळत असल्याने दोघींमध्ये वाद नव्हते. दुसऱ्या मैत्रिणीला गुन्हे शाखेने नाशिक येथे नेले आहे. या दोघींव्यतिरीक्त ललितच्या आणखी काही मैत्रिणी असल्याचे पोलिसांनी सांगितले.