पुणे – शेअर बाजारात गुंतवणूकीवर आकर्षक परतावा मिळवून देण्याच्या अमिषाने 400 हुन अधिक नागरिकांची 16 कोटी 16 लाख 95 हजार 470 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लेखा परीक्षकाला (सी.ए.) अटक केली. त्याला 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश एस.एस.गोसावी यांनी दिला आहे.
कैलास राधाकिसन मुंदडा (वय 42, रा. सिंहगड रोड) असे त्याचे नाव आहे. यापुर्वी , मुख्य आरोपी महेशकुमार लोहिया (वय 31), सुनील सोमानी (वय 54), गजानन माने (वय 30) या तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत 51 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. नोव्हेंबर 2016 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत शुक्रवार पेठ परिसरात ही घटना घडली.
फिर्यादींनी लॉगटर्म गुंतवणूकसाठी दिलेला 10 लाख रुपयांचा धनादेश महेशकुमार याने त्याच्या बॅंक खात्यात जमा केला. फिर्यादींना खात्याची खोटी माहिती सांगून बनावट नफा तोटा पत्रके तयार करून ती ई-मेलद्वारे पाठवून, खोटे संदेश पाठवून दिशाभूर केली.
या प्रकरणात 400 हुन अधिक लोकांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी मुंदडा याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील मारूती वाडेकर यांनी केली.