पुणे –करोना काळात तातडीची बाब म्हणून स्मशानभूमीत विद्युत विषयक काम केल्याचे दाखवून एक कोटींची बनावट बिले सादर केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी मुख्यसभेत याबाबत घोषणा केली.
या प्रकरणी पालिकेकडून तक्रार केल्यानंतरही पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही पालिकेच्या मुख्यसभेत समोर आले आहे. मख्यसभेत मनसेसह, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांनी या प्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी मुख्यसभेत आंदोलन केल्यानंतर प्रशासनाकडून या समितीची घोषणा करण्यात आली.
महापालिकेची मुख्यसभा सुरू होताच, मनसेचे महापालिकेतील गटनेते साईनाथ बाबर आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी या बनावट बील प्रकरणी प्रशासनाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा प्रकार समोर येऊन आठवडा झाला तरी त्याच्याची संबंधित कोणावरच कारवाई का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यानंतर कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीने या आंदोलनास पाठिंबा देत मुख्यसभेत या विषयावर चर्चा करण्याची मागणी करीत प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी केली. ही बाब शहरासाठी लाजीरवाणी असून संबंधितावर कारवाई का नाही, असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला. तर सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचार बाहेर येऊ द्यायचा नसल्यानेच करोना काळातही विकासकामांवर बोलविली खास सभा घेतली जात नाही. प्रशासनाकडे पुराव्यांसह कागदपत्रे देऊनही भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची तपासणी केली जात नाही, अशी टीका नगरसेवक बागवे यांनी केली.
एका बाजूला प्रशासन नगरसेवक आणि नागरिकांना कायदे दाखविते मग अशा कोट्यवधीचा भ्रष्टाचार होताना प्रशासनाला पालिकेच्या नावाला काळिमा फासणारे अधिकारी दिसत नाहीत का? असा सवाल यावेळी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी उपस्थित केला. तसेच गेल्या चार वर्षांत झालेल्या भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची चौकशी अद्याप का झाली नाही, त्यासाठी कोणाचा दबाव आहे हे प्रशासनाने जाहीर करावी अशी मागणी केली.
पालिकेत हा एक विषय समोर आला असून आणखी विषयही झालेले नाकारता येत नाही त्यामुळे करोना काळात झालेल्या सर्वच कामांची तपासणी करावी तसेच अशा प्रवृत्तींना पायबंद घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली. तर अशा प्रकारे खोटी बिले काढून भ्रष्टाचाराला या शब्दालाही लाज वाटेल, असे कामकाज महापालिकेत सुरू असल्याची टिका कॉंग्रेस गटनेते आबा बागूल यांनी केली. तर हा घोटाळा मोठा असून अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच झाल्याने तो बाहेर येण्यास उशीर लागला त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली.
महानगपालिकेचे खोटे शिक्के, सह्या तयार करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याचा उघडकीस आलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. पालिका आयुक्तांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार करून गुन्हा दाखल केला पाहिजे. यामध्ये केवळ एक व्यक्ती सहभागी नसून अनेकांचा सहभाग असणार आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची जबाबदारी पालिका आयुक्तांनी पार पाडली पाहिजे.
– गणेश बिडकर, सभागृह नेता, पुणे महानगरपालिका
याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसे पत्रही पोलिसांना देण्यात आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणे झालेले आहे. मात्र, त्यानंतरही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, त्याच वेळी प्रशासनाकडून या प्रकरणाच्या सखोल चौकशी केली जाणार असून दक्षता विभागाच्या नियंत्रणाखाली तातडीने ही समिती चौकशी करून त्याचा अहवाल मुख्यसभेत सादर करेल.
– डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त