पुणे –भारतीय जनता पक्षाचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दि. 26 नोव्हेंबरला पुण्यात येणार होते. तत्पूर्वीच शहा यांच्या या दौऱ्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली होती.
केंद्रीयमंत्री शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ आणि महानगरपालिका निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार असल्याचा मुद्दा पुढे करीत यातून गलितगात्र झालेल्या भाजपची केविलवाणी धडपड सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली. तसेच, गेल्या साडेचार वर्षांत भाजपने शहरासाठी काहीच केले नसल्याने कुणीही आले तरी फरक पडणार नसल्याची टीका जगताप यांनी केली होती.
दरम्यान, शहा यांचा दौराच स्थगित झाल्यामुळे अनावश्यक शाब्दीक चकमकी हा विषयी आज चर्चेचा ठरला.
जगताप म्हणत होते की, पुणेकरांनी मोठ्या अपेक्षेने भाजपला एकहाती सत्ता दिली. सत्ताधारी भाजप आणि भाजपचे नगरसेवक यांच्याकडून नागरिकांच्या पदरी निराशा पडली. कोल्हापूर सोडून पुण्यात तळ ठोकलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने पुणेकर मते देणार नाहीत, तथाकथित “पोलादी पुरुष’ देवेंद्र फडणवीस यांच्या नावे मते मिळणार नाहीत, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावेही मते मिळणार नाहीत, याची पुरेपूर जाणीव भाजपला आहे. त्यामुळे शहा येत असल्याचे जगताप यांचे म्हणणे होते.
बिडकर यांनीही दिले होते प्रतिउत्तर…
संविधान दिनाच्या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि रयतेचा राजा असलेल्या श्री छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे भूमिपूजन या कार्यक्रमासाठी अमित शहा पुण्यात येत असल्याचे तसेच तो कार्यक्रम घेणे म्हणजे भाजपाच्या पायाखालची वाळू घसरणे आहे, असा विचार प्रशांत जगताप करीत असतील तर यांची आम्हाला कीव आल्याचे तसेच सरंजामदारी मानसिकता असलेल्या पक्षाला संविधान दिनाचे काही देणेघेणे नाही, हे देखील यातून दिसते. जगताप तुमची झेप फक्त सत्ता आणि निवडणूक यापुरतीच मर्यादित झाली आहे. मार्च 2022 मध्ये नक्की काय ते जगताप यांना समजेल, असे प्रतिउत्तर पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनीही दिले होते.