सिंहगडरस्ता- स्टील, सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने उपनगर परिसरातील बहुतांशी बांधकामे संथगतीने तर काही बंद ठेवण्यात आली आहेत. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती तसेच मेट्रो सेसचा थेट परिणाम या व्यावसायावर झाला आहे. याशिवाय साहित्याची दरवाढ झालेली असताना मजुरीतही साधारणत: 40 टक्क्यांनी वाढ झाल्याने याच फटका बांधकाम व्यावसायिकांना बसतो आहे. सदनिका खरेदीवर दि. 1 एप्रिलपासून एक टक्का मेट्रो अधिभार लागू होण्याची शक्यता असल्यानेही ग्राहकांकडून सध्या विचारणा होत नसल्याचे बांधकाम व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. रेरा कायद्यानुसार ग्राहकांना एकदा किंमत निश्चित केले की यानंतर सदनिकेच्या दरात वाढ करता येत नाही. त्यामुळे बांधकाम साहित्य दरवाढीतून बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत.
*साहित्याचे दर वाढले; मेट्रो अधिभाराचाही बसणार फटका
*स्टीलचा दर 45 रुपये किलो वरून
90 रुपयांवर गेला आहे.
*सिमेंट गोणी 250 रुपयांवरून
400 रुपये झाली आहे.
*विटा, वाळू, खडी, वायर, टाइल्स यात
40 ते 50 टक्के वाढ.
*लोखंडाचे दर वाढल्याने फॅब्रिकेशन दरातही 20 ते 30 टक्के वाढ.