पुणे – यंदा मिळकत कराचे उत्पन्न 1,195 कोटी रुपये

नव्या वर्षाच्या बिलांचे वाटपही सुरू

पुणे – सन 2018-19 या आर्थिक वर्षातील 31 मार्चपर्यंत महापालिकेला मिळकतकर रुपात 1,195 कोटी 75 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तसेच नव्या वर्षातील बिलांचे वाटपही महापालिकेने सुरू केले आहे.करसंकलन तथा करआकारणी प्रमुख विलास कानडे यांनी याविषयी माहिती दिली.

सन 2018-19 मध्ये 1195 कोटी 75 लाख रुपये जमा झाले आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदा शंभर कोटी जास्त जमा झाले आहेत. मागील वर्षी म्हणजे सन 2017-18 मध्ये 1हजार 74 कोटी रुपये मिळकतकर जमा झाला होता. त्या आधी 2016-17 मध्ये मात्र सगळ्यात जास्त म्हणजे 1,201 कोटी रुपये जमा झाले होते. त्यावेळी अभय योजना राबवण्यात आल्याने उत्पन्नात वाढ झाली होती. याशिवाय नोटबंदी झाल्यामुळे आणि जुन्या नोटा स्वीकारल्या जातील हे सांगितल्यामुळे नागरिकांने मोठ्याप्रमाणात कर भरणा केला होता.

मिळकतकर न भरलेल्यांची संख्या सात लाख असून, दि.27 मार्चपासूनच त्यांना बिले देण्याला सुरूवात केली आहे. यावर्षी महापालिकेच्या जुन्या हद्दीत नऊलाख तर समाविष्ट 11 गावांमध्ये दीड लाख अशी एकूण साडेदहा हजार बिले वाटली जाणार आहेत. या बिलांचे वितरण पोस्टाद्वारे केले जाणार आहे. समाविष्ट गावांमध्ये पहिल्यांदाच अशी बिले वाटली जाणार आहेत.

पहिल्या दिवशी म्हणजे दि.1 एप्रिल ते 31 मे दरम्यान मिळकतकर जमा केल्यास करात 5 ते 10 टक्के सवलत दिली जाते. दरवर्षी किमान 6 लाख मिळकतधारक पहिल्या दोन महिन्यांतच मिळकतकर जमा करतात. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी साडेसात हजार मिळकतधारकांनी सुमारे 6 कोटी रुपये कर जमा केला आहे. मागील वर्षी 2 हजार मिळकतकरधारकांनी सव्वाकोटी रुपये जमा केले होते.

विभागप्रमुखांनी भरला पहिल्या दिवशीच कर
आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीच स्वत:च्या घराचा मिळकतकर भरून कर आकारणी-करसंकलन विभाग प्रमुख विलास कानडे यांनी आदर्श घालून दिला आहे. वेळेत कर जमा केल्यास दंड भरावा लागणार नाही; उलट सवलत मिळते. त्यामुळे जास्तीतजास्त नागरिकांनी 31 मेपर्यंत मिळकतकर भरा, असे आवाहनही कानडे यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.