रुग्ण पुण्याबाहेरील; निर्बंध मात्र पुण्याला
पुण्याबाहेरचे रुग्ण अधिक ;निकषांनी शहराची अडचण
सुनील राऊत
पुणे : राज्यशासनाच्या ब्रेक दि चेनच्या नवीन नियमवलीत पुणे शहर तिसऱ्या टप्प्यात आले आहे. मात्र, निकष पाहता, शहरातील रूग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या तसेच दैनंदिन बाधितांमध्ये शहराबाहेरील रूग्णांचाही समावेश असल्याने महापालिकेची बाधितांची टक्केवारी तसेच ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची टक्केवारी वाढली असल्याने शहराला दुसऱ्या टप्प्यांच्या निकषांमधील सवलतींचा लाभ मिळत नसल्याचे समोर आले आहे.
परिणामी शहरात नाटयगृहे,मॉल बंद ठेवण्यासह, खासगी कार्यालयांची उपस्थिती, 100 टक्के क्षमतेने बस वाहतूक सुरू न होणे, संचारबंदी रद्द होणे अशा अनेक सवलतींपासून वंचित रहावे लागले आहे. शहरातील दैनंदिन बाधितांचा दर तीन दिवसांपासून 5.10 टक्केच्या आसपास आहे तर एकूण ऑक्सिजन बेडच्या तुलनेत 27.47 टक्के ऑक्सिजन बेडवरील रुग्ण आहेत.
असा बसला पुण्याला फटका
शासनाच्या निकषानुसार, पहिल्या टप्प्यासाठी बाधितांचा दर 5 टक्के तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत, महापालिका हद्दीतील आठवडयाचा बाधितांचा दर 6.11 टक्केआहे. तर मागील तीन दिवसांपासून तो 5.9 टक्के वर आला आहे. त्याच वेळी ऑक्सिजन बेडवर असलेल्या रुग्णांची टक्केवारी 27.47 टक्के आहे. त्यामुळे, पालिका बाधितांच्या दरात पहिल्या टप्प्यात आली तरी बेडची टक्केवारी अडीचने अधिक आहे.
त्यामुळे महापालिका निकषांनुसार, तिसऱ्या टप्प्यात आली आहे. मात्र, शहरात असलेल्या एकूण रूग्णांमध्ये जवळपास 20 ते 25 टक्क्यांपेक्षा अधिकचे रुग्ण हे शहराबाहेरील आहेत. तसेच दैनंदिन चाचण्यांमध्येही शहराबाहेरील रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हे रूग्ण कमी केल्यास शहर पहिल्या टप्प्यात येत आहे. त्यामुळे रुग्ण पुण्याबाहेरील असतानाही नियमांमुळे त्याचा फटका मात्र शहराच्या अनलॉकला बसणार आहे.