मांजरी (प्रतिनिधी) – नोकरभरती बाबतचे नियम डावलून मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतने विविध पदांसाठी बेकायदेशीर नोकरभरती केली आहे. त्यामध्ये ग्रामसेवकासह पदाधिकारी व सदस्यांनी रक्ताच्या नात्यातील व जवळच्या उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. अशी तक्रार अखिल मांजराईनगर नागरिक कृतीसमितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी केली आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“आपल्याकडे आलेल्या तक्रारीनुसार मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत नोकरभरती बाबतची चौकशी सुरू आहे. त्यासाठी चौकशी समिती नेमण्यात आली असून अहवाल आल्यावर तक्रारीत तथ्य आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल.’
-प्रशांत शिर्के (गटविकास अधिकारी, हवेली तालुका)
ग्रामपंचायतने २८ ऑक्टोबर २०२० रोजी सरपंच शिवराज घुले यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा घेतली होती. या सभेच्या ठराव क्रमांक ८७ ने ही बेकायदेशीर भरती केली आहे. करवसुली लिपिक, कार्यालयीन लिपिक, पाणीपुरवठा कर्मचारी, सफाई कामगार, ड्रायव्हर, वायरमन व कर आकारणी वरिष्ठ लिपिक, वायरमन, स्मशानभूमी नियंत्रक, कार्यालय शिपाई अशी एकूण ३३ पदे भरण्यात आली आहेत.
मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीने नियमानुसार नोकर भरती केली आहे. नोकर भरती करण्यासाठी गावात दवंडी पिटली होती. गावाची लोकसंख्या आणि येथील कामाचा वाढलेला आवाका लक्षात घेऊन कामगार भरती करणे गरजेचे होते. त्यामुळे ही नोकर भरती केली आहे.
शिवराज घुले ( सरपंच, मांजरी बुद्रुक ग्रामपंचायत)
कृतीसमितीचे अध्यक्ष राजेंद्र साळवे म्हणाले, “नोकरभरतीसाठी कोणतीही जाहिरात प्रसिद्ध न करता ग्रामपंचायत कायद्याचा भंग केला आहे. ग्रामसेवकाने स्वतः चा मुलगा, व जवळचा नातेवाईक तर इतर सदस्यांनी आपले नातेवाईक व कार्यकर्त्यांना यामध्ये घेतले आहे. गाव पालिकेत जाण्याच्या दृष्टीकोनातून ही भरती केली आहे.’