पुणे – पुतळ्यांपेक्षा हॉस्पिटल्स उभारली असती

लेखक किरण नगरकर : भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार

पुणे – “इतिहासातील काही गोष्टी खोडून टाकण्याचा प्रयत्न सध्या केला जात आहे. पटेलांचा मोठा पुतळा उभा करण्यापेक्षा किमान 25 हॉस्पिटल्स बांधता आले असते. मोठ्या उंचीचे पुतळे उभारून उपयोग नाही. ज्यांचे पुतळे उभे केले जातात, त्यांना पुतळे नको आहेत, त्यांना कामगिरी हवी आहे,’ असे परखड मत ज्येष्ठ लेखक किरण नगरकर यांनी व्यक्त केले.

आरोग्य सेना आणि भाई वैद्य फाउंडेशनच्या वतीने भाई वैद्य यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त “लोकनेते भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कार’ ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. परंतु सहगल प्रकृतीच्या कारणास्तव प्रत्यक्षात उपस्थित राहू न शकल्यामुळे लेखक किरण नगरकर यांनी सहगल यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला. यावेळी ते बोलत होते. यावेळी सहगल यांनी “व्हिडीओ’द्वारे उपस्थितांशी संवाद साधला.

तर, “भाई केवळ बोलले नाहीत, तर त्यांनी प्रत्यक्ष काम केले. भाईंच्या मनातील विद्रोह केवळ शब्दांमध्ये थांबला नाही. त्यांना अन्यायाबाबत प्रचंड चीड होती. सध्या अधिकारांचा गैरवापर होत आहे. इतकेच नाही तर निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर धर्मावर देखील बोलले जात आहे. पण तळागाळातील माणसाचा प्रत्यक्ष विचार होताना दिसत नाही. त्याचबरोबर आपण कोणते सांस्कृतिक जीवन अनुभवत आहोत, याचा देखील विचार आपणच करणे गरजेचे आहे,’ असे मत डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केले.

यावेळी भाई वैद्य फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य, पन्नालाल सुराणा, डॉ. प्राची रावळ, लक्ष्मीकांत देशमुख, जयंत मटकर, प्रा. विलास वाघ, डॉ. नितीन केतकर, प्रा. गीतांजली वैद्य आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आधुनिक शिक्षणपद्धती आणि सरकारवरही भाष्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीलिमा वैद्य यांनी केले. डॉ. नितीन केतकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर वर्षा गुप्ता यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.