पुणे- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट प्रस्थापित सुवर्णयुग सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी हेमंत रासने आणि उपाध्यक्ष म्हणून नितीन राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनियुक्त संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत या निवडी झाल्या आहेत.
रासने हे बॅंकेचे ज्येष्ठ संचालक असून, सन 2009 ते 2011 या कालावधी त्यांनी बॅंकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या कारकिर्दीत बॅंकेने “नॉन परफॉर्मिंग सेटस’चे (एनपीए) प्रमाण शून्य टक्के राखण्यात यश मिळविले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख म्हणूनही रासने कार्यरत आहेत.
येत्या आर्थिक वर्षात बॅंक सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. नजिकच्या काळात बॅंकेचा शाखा विस्तार 50 पर्यंत आणि व्यवसाय 5 हजार कोटी रुपये करण्याचा निर्धार आहे. तसेच “एनपीए’ शून्य टक्के करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. बॅंकेची स्वतंत्र आणि भव्य वास्तू साकारणार आहोत, अशी प्रतिक्रिया रासने यांनी दिली. उपाध्यक्ष राऊत यांना बॅंकिंग कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.