सविंदणे – पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील भाच्याच्या शेतातील ऊस मामाने तोडल्याने याबाबत ऊसतोड मुकादमाला विचारणा केली. यावेळी मामा, मामीने, मामाच्या मुलाने भाच्याला व त्याच्या पत्नीला कुऱ्हाडी, खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने उसाने मारहाण करीत डावा हात फॅक्चर केले. यात खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये चंद्रकांत सूर्यवंशी (रा. पिंपळसुटी) यांनी फिर्याद दाखल केली आहे. बापू रामदास चव्हाण, गोरख नामदेव चव्हाण, सविता बापू चव्हाण, मुक्ताबाई नामदेव चव्हाण, रामदास केशव चव्हाण (रा. पिंपळसुटी, ता. शिरूर, जि. पुणे), असे गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.11) दुपारच्या सुमारास चंद्रकांत सूर्यवंशी हे पत्नीसह त्यांच्या शेतात उसाची तोड आल्याने तेथे गेले होते. त्यांना उसाची तोड झालेली दिसली. त्यावेळी त्यांनी ऊसतोड मुकादमास तुम्ही कोणाला विचारून ऊसतोड केली, अशी विचारणा केली. त्यावर त्यांचा मामा रामदास केशव चव्हाण, मुलगा बापू रामदास चव्हाण,
गोरख नामदेव चव्हाण व मामी सविता बापू चव्हाण, मुक्ताबाई नामदेव चव्हाण अशा सर्वांनी येऊन हा ऊस आमचा आहे, तुमचा काही संबंध नाही, असे म्हणत भाचा चंद्रकांत व त्याची पत्नी लता हिच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून वरील सर्वांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच मामा रामदास चव्हाण यांनी यांना सोडू नका व सर्वांना जिवे मारा, असे म्हणत कुऱ्हाडीच्या, खोऱ्याच्या लाकडी दांडक्याने व उसाने जबर मारहाण करीत शिवीगाळ केली.
फिर्यादीस बापू रामदास चव्हाण यांनी खोऱ्याच्या दांडक्याने मारहाण करीत डावा हात फॅक्चर करून तसेच डाव्या पायाच्या मांडीला दांडक्याने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यांचा मेहुणा दत्तात्रय व त्याची पत्नी रूपाली हे भांडण सोडविण्यास आले असताना त्यांनाही मारहाण करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक साबळे हे करीत आहेत.