पुणे -सोशल मिडियाचा गेल्या काही वर्षांत वापर वाढला आहे ही गोष्ट नवी नाही, परंतु त्यामुळे पर्यटनामध्ये वाढ झाली आहे ही मात्र “पॉझिटिव्ह’ गोष्ट हल्ली पहायला मिळत आहे.
शनिवार-रविवार म्हटल्यावर पूर्वी मस्त मेनू बनवून घरात टीव्ही पहात लोळत पडणे किंवा फारतर कोणत्या नातेवाईकाच्या घरी जाणे, थिएटरमध्ये जाऊन एखादा चित्रपट टाकला (पाहिला), त्यातून लहान मुले घरात असतील तर त्यांना घेऊन बागेत, एखादी खरेदी करणे एवढीच “एन्जॉयमेंट’ असायची. परंतु हल्ली “घरात थांबणे’ म्हणजे शहरातच थांबणे असे फारसे होताना दिसत नाही. सहकुटुंब छोट्या-छोट्या सहली आयोजित केल्या जातात. त्यातून सर्वाधिक पसंती ही सध्या गडकिल्ल्यांना दिली जात आहे. त्यातून जिल्ह्यात आणि आसपासला असलेल्या गडकिल्ल्यांवार ट्रेकिंग करण्याला अनेकजण सध्या जाताना दिसतात.
आपण कुठे गेलो याच्या सेल्फी टाकण्याचे प्रकार हल्ली सोशल मीडियावर टाकले जातात. पर्यटनस्थळांवरील फोटो तर भारंभार दिसतात. त्या “सेल्फी’मध्ये बॅकग्राऊंडला अनेक आकर्षक स्थळे दिसतात. उंचीवर जाऊन आजूबाजूच्या टेकड्या दिसतील असे सेल्फी टाकले जातात. त्याविषयी सोशल मीडियावर लिखाणही केले जाते. साहजिकच यातून माहितीची देवाणघेवाण होते आणि पुढच्या शनिवार रविवारचे लगेचच त्या पर्यटन स्थळाचे प्लॅनिंग केले जात आहे.
यामध्ये सध्या सर्वाधिक पसंती ही गडकिल्ल्यांवरील ट्रेकिंगला दिली जात आहे. ग्रुप बनवून किंवा सहकुटुंब अशा ठिकाणांना अनेकजण वीकेन्डला जात आहेत. या सर्वच ठिकाणी हल्ली जेवणाखाण्याची सोय झालेली असल्यामुळे, दोन दिवस आरामात फिरायला जाता येऊ शकते. गडकिल्ल्यांवरही आता छोट्या स्वरूपातील हॉटेल्स असल्यामुळे तेथेही खाण्यापिण्याची आबाळ होत नाही.
सोबत काही ओझे “कॅरी’ करायचीही गरज पडत नाही. त्यामुळे हौशी पर्यटकांसाठी हे छोटे ट्रेक किंवा सहल ही वीकेन्डला आनंद देऊन जाणारी आणि आठवडाभराचा कामाचा ताण हलकी करणारी ठरतेय.