भोर -भोर शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि नगरपलिकेच्या उत्पन्न वाढीसाठी नगरपलिकेने पहिल्या टप्यात काही भागांत “पे अँड पार्क’ योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे भोरमधील नागरिकांना रस्त्याच्या कडेला वाहने लावण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत, तर “नो पार्किंग’मधील वाहनांना दंड भरावा लागणार असून, या आठवडाभरात शहरात योजनेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतूक कोंडीने डोके वर काढले आहे. एसटी बसस्थानक ते राजवाडा चौक, बजरंग आळी ते पोलीस चौकी, काळा गणपती चौपटी या भागात वाढलेले अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. शहरातील गणेश पेठ, आमराई आळी, भोई आळी परिसरात चुकीच्या पद्धतीने वाहने रस्त्यावर उभी केली जातात त्यामुळे ” पे अँड पार्क’चा पर्याय आखला असून यामुळे वाहतूक कोंडीला शिस्त लागून कोंडी कमी करण्यासाठी उपयोग होणार आहे.
ऑगस्ट 2022 मधील सर्वसाधारण सभेत नगर परिषदेने याबाबत बहुमताने ठराव मंजूर केला होता. या ठरावामध्ये नगर परिषद हद्दीतील बसस्थानक ते राजवाडा, पंचायत समिती परिसर, स्मशानभूमी येथे पार्किंग व्यवस्था करावी. ते काम ठेका देऊन करावे, असा या सभेत ठराव मंजूर केला होता.
गर्दीच्या भागात योजना राबवणार
पहिल्या टप्प्यात शहरातील गर्दीच्या ठराविक भागात ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी नगर परिषदने जानेवारी महिन्यात काळा गणपती मंदिर ते भोरेश्वर मंदिर, राजवाडा चौक, पंचायत समिती परिसरात रस्त्यावर पार्किंगचे पट्टे आखून जागा निश्चित केल्या आहेत.
ठेकेदार कंपनीकडून आवश्यक तेथे सूचना फलक, सुरक्षा व्यवस्था, वाहने उचलण्यासाठी क्रेनची तरतूद केली जाणार आहे. भोर शहरात पार्किंगच्या ठिकाणे काळा गणपती चौक ते राजवाडा, राजवाडा ते भोरेश्वर मंदिर,राजवाडा ते पंचायत समिती, राजवाडा परिसर, स्मशानभूमी परिसर, मशालजीचा माळ ते बसस्थानक रस्ता, बसस्थानकासमोरील परिसर, नीरा नदीवरील पुलाजवळच्या प्रवेश कमानीचा भाग.
जादा रकमेची आकारणी
नगर परिषदेने केलेल्या ठरावानुसार जानेवारीमध्ये काम सुरू केले आहे. सध्या बस, कार, जीप, दुचाकी यांसाठी स्वतंत्रपणे पहिल्या तीन तासांसाठी आणि त्यानंतर पुढील तासासाठी दरपत्रक प्रसिद्ध केले आहे. “नो पार्किंग झोन’मध्ये उभ्या केलेल्या वाहनांसाठी दंड म्हणून जादा रकमेची आकारणी होणार आहे.
पहिल्या टप्यात शहरातील काही भागांत “पे अँड पार्किंग’ हाती घेतले आहे. ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू होईल असे
-हेमंत किरूळकर, मुख्याधिकारी, भोर नगरपालिका