जेजुरी – भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जन्मदिवस दि 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिनानिमित्त जिल्ह्यातील मराठी व सेमी माध्यमाच्या शाळांतील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे टॅलेंट सर्च एक्झाम 2022 चे आयोजन करण्यात आलेले होते. या परीक्षेसाठी पुणे जिल्ह्यातील 337 विद्यालयातील 23 हजार 230 परीक्षार्थी सहभागी झाले असल्याची माहिती पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य नंदकुमार सागर यांनी दिली.
राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .विद्यार्थ्यांच्या गणिताच्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, गणिताची आवड निर्माण व्हावी व इयत्ता दहावीच्या बोर्ड परिक्षा गणित विषयाची उत्तम तयारी व्हावी या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर सर यांनी दिली.
परीक्षा गुरुवारी (दि. 22) सकाळी अकरा वाजता संपन्न झाली. या परीक्षेचे आयोजन पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, गणित विज्ञान अध्यापक संघटनेचे कल्याण कडेकर, भारत काळे, डी. एच. शिंदे, सचिन धनवट, रोहिदास एकाड, विद्या समितीचे अध्यक्ष तबाजी वाघदरे, सचिव भानुदास रिठे आदींनी केले होते.