नगर – शहरात बालकांत गोवर आजाराची लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरासह जिल्ह्यात गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे. 25 डिसेंबरपर्यंत पहिल्या टप्प्यातील लसीकरण सुरू राहणार आहे. या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत जिल्ह्यातील 3099 बालकांना गोवर रुबेला प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
लहान मुले व बालकांमध्ये व्हायरल फ्लूचे प्रमाण वाढले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी गोवर संशयित 40 बालकांचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यातील एकाचा अहवाल पॉजिटिव आला होता. त्यानंतर महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केल्या. 15 ते 25 डिसेंबर दरम्यान पहिला डोस व 15 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान दुसरा डोस अशा पद्धतीने व्यापक स्वरुपात लसीकरण अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले. शहरात अंदाजे 3 ते 4 हजार लहान बालके असून त्यादृष्टीने नियोजन करून महापालिकेची आरोग्य केंद्रे व अन्य काही केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन केले आहे.