– दीपक येडवे
वीसगाव खोरे -वडगाव डाळ (ता. भोर) येथील एका प्रगतशील युवा शेतकऱ्याने 2016 मध्ये 20 गुंठ्यांत पॉलीहाऊस उभे करत गुलाबाची शेती करण्यास सुरुवात केली आणि सहा वर्षांत त्यांनी या शेतातून लाखोंचे उत्पन्न घेतले. वडगाव डाळ येथील या शेतकऱ्यांचे नाव विवेक कानडे. त्यांनी जमिनीची मशागत करून उभा आणि आडवा रोटर माराल्यावर साधारणपणे 70 सेमी बाय 50 बाय 40 सेमीचे बेड तयार करून घेतले.
हे बेड तयार केल्यानंतर रोपांमधील अंतर तीन इंच बाय दहा इंच ठेवून लागवडीसाठी काढलेले खड्डे हे माती आणि खताने भरून घेतले. बेसल डोसमध्ये एनपीके बोरॉलमक्स, केपी प्लाण्ट झाइम, सिंगल सुपर फोस्फट, शेणखत यांचा वापर केला आणि 16 हजार रोपे लावली. तीन ते चार पानांची रोप बारा रुपयांप्रमाणे घेतली.
या भागात शेततळे तयार करून ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन करण्यात आले आहे. वॉटर सोलिबल खत, कॅल्शियम नायट्रेट ठिबकद्वारे आठवड्यातून चारवेळा खते सोडली जातात. पॉलीहाऊसमध्ये कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेतले जाते. साधरणपणे तीन महिन्यात मार्केट योग्य फुले तयार होतात. दिवसाला 1 हजार फुलांचे उत्पादन होते.
पिवळ्या-पांढऱ्या फुलांनाही चांगली मागणी
लग्नसराईमुळे गुलाबाच्या फुलांच्या किमतीतही वाढ झाली आहे. साधारणतः लाल गुलाबांची 20 फुलांची गड्डी 275 ते 300 रुपयांपर्यंत, तर पिवळ्या आणि पांढऱ्या गुलाबांच्या गड्डीला 400 ते 450 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
मी, माझी पत्नी आणि आई आम्ही पॉलीहाऊसचे व्यवस्थापन करतो. कंपनीत काम करून उरलेला वेळ शेतात देतो. उच्च दर्जाची, सुंगधी, टपोरी फुले यावर भर दिला जातो. व्हलेटाईन डे लो यंदा फुलांना चांगला भाव मिळाल्याने उत्पन्नही भरघोस मिळाले.
– विवेक कानडे, प्रगतशील युवा शेतकरी