मंचर -कळंब, एकलहरे, चांडोली, लौकी, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, चास (ता. आंबेगाव) गावांतील तरुण, ज्येष्ठांनी तसेच गावातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत शिवजयंती उत्सवादरम्यान शिवप्रतिमेचे पूजन करून सकाळच्या सत्रात साजरा केला. जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावरून तरुणांनी आणलेल्या ज्योतीचे पूजन करून विविध उपक्रम राबवून शिवजयंती उत्सव कार्यक्रम साजरा केला.
कळंब येथे ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत व गावातील वाडीवस्तीवरील सर्व मंडळांच्या पदाधिकारी व सभासद तरुणांनी एकत्रित येत श्री शिवछत्रपती महाराज यांची 372 वी जयंती “एक गाव एक शिवजयंती उत्सव’ जल्लोषात साजरा केला. यावेळी सरपंच उषा सचिन कानडे आणि माजी सरपंच राजश्री भालेराव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक रमेश कानडे आणि कमलादेवी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भालेराव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शिवजयंती उत्सवाच्या वेळी शरद बॅंकेचे माजी अध्यक्ष सूर्यकांत थोरात, ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक यशवंत कानडे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डी. आर. भालेराव भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक बाबुराव कानडे. ग्रामपंचायत सदस्य नितीन भालेराव, कमलेश वर्पे, गुलाबबाई कानडे, निर्मला थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश उर्फ पप्पू येवले, सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सखाराम भालेराव उपस्थित होते. सूत्रसंचालन करून राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक बाळासाहेब कानडे यांनी आभार मानले. ग्रामपंचायत चौकामध्ये निफाड येथील शिवव्याख्याते संतोष कातकाडे यांचे व्याख्यान झाले.