देवदत्त निकम ः खंडोबा देवाची यात्रा शुक्रवारपासून
मंचर/रांजणी – श्रीक्षेत्र थापलिंग (नागापूर, ता. आंबेगाव) येथील घाटात यंदा आठ वर्षानंतर बैलगाडा शर्यतींचा थरार पहायला मिळणार आहे. शैर्यती शांततेत पार पडण्यासाठी यंदा टोकन पद्धतीने बैलगाडे सोडण्यात येणार आहेत. मंगळवार (दि. 3) सकाळी 8 ते 11 या वेळेत बैलगाडा मालकांना थापलिंग गडावर टोकन देण्यात येणार आहेत. तब्बल आठ वर्षानंतर थापलिंग घाटात बैलगाडा शर्यती होणार असल्याने घाटाची दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
पौष पौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र थापलिंग (नागापूर, ता. आंबेगाव) येथील खंडोबा देवाची यात्रा शुक्रवार (दि. 6) आणि शनिवारी (दि. 7) होणार आहे. यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती थापलिंग देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली. करोनानंतर दोन वर्षांनंतर ही यात्रा उत्साहात भरणार आहे. त्याची जय्यत तयारी देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.
थापलिंग यात्रेनिमित्त पुणे, नगर जिल्ह्यातील लाखो भाविक गडावर येऊन खंडोबा देवाचे दर्शन घेतात. या यात्रेत नवसाचे बैलगाडे पळवले जातात. यासाठी कोणत्याही प्रकारचे इनाम अथवा बक्षिसे ठेवली जात नाहीत; परंतु भाविक श्रद्धेपोटी थापलिंग घाटात नवसाचे बैलगाडे आणून पळवितात.
घाटाच्या दोन्ही बाजूच्या कठड्यांची उंची वाढवली आहे, तसेच निशाणाच्या ठिकाणी उंचवटा बांधून तेथे पायऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शैर्यतीनंतर बैल त्वरित थांबण्यासाठी मोठ्या उंचीचे आळे तयार करण्यात आले आहे.