सविंदणे -गोलेगाव (ता. शिरूर) येथून शिरूरला शाळेत जाण्यासाठी निघालेल्या अल्पवयीन मुलीला एका कारचालकाने लिप्ट देऊन तिच्याबरोबर अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये कारचालक, सहकारी महिलेविरुद्ध विनयभंगासह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
गोलेगावातून शिरूर येथे शाळेला येण्याकामी एका मुलीला कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते. (दि.17) सकाळी दहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे गोलेगाव ते शिरूर या रोडवर शाळेत जाण्यासाठी एकटीच उभी राहून वाहनाची वाट पाहत होती. त्यावेळी तिला गोलेगावकडून एक पांढऱ्या रंगाची कार आलेली दिसली. तेव्हा त्या गाडीला हात केला. गाडी तिच्याजवळ येऊन थांबली. त्या कारमध्ये 20 ते 25 वर्षे वयोगटातील एक मुलगा ड्रायव्हर सीटवर बसलेला होता.
25 ते 30 वयोगटाची एक मुलगी मागच्या सीटवर बसली होती. तिने त्यांना मला शिरूरला सोडता का, असे विचारले. त्यांनी होकार दिल्याने ती मागे बसू लागली. त्यावेळी तिला “पुढच्या सीटवर बस’, असे पाठीमागे बसलेल्या मुलीने सांगितले. त्यामुळे पीडित मुलगी पुढच्या सीटवर बसली. कारमधून थोडे पुढे आल्यावर त्या मुलाने मुलीशी अश्लील चाळे केले. तिने त्यांना गाडी थांबवण्यास सागितले. ते कार थांबवित नसल्याने ती आरडाओरड करू लागली.
त्यांनी गोलेगाव पुलाजवळ कार थांबविली. पीडित मुलगी कारमधून खाली उतरून त्या कारचा नंबर पाहिला. ती कार तेथून डाव्या साईडला टर्न मारून पुणे हायवे रोडला गेली. त्यांनतर ती घाबरली. तिने वडिलांना फोनवरून घडलेली हकीकत सांगून वडिलांसमवेत शिरूर पोलीस स्टेशन गाठले. कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले या करीत आहेत. कारची माहिती मिळाल्याने अल्पवयीन मुलीचा विनभंग करणाऱ्यांना गजाआड करण्याचे आव्हान शिरूर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.