जेजुरी -भारतीय नववर्षदिनानिमित्त (गुढीपाडवा) जेजुरी गडावर कुलदैवत खंडेरायाची विधिवत पूजा -अभिषेक करीत गुढी उभारण्यात आली. यावेळी पुजारी, सेवेकरी, ग्रामस्थ, देवसंस्थान कर्मचारी -अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक महिन्याची अमावस्या झाली की, शुद्ध प्रतिपदेला पहाटेची भूपाळी आरती झाली की, जेजुरीच्या मल्हारगडावरील मुख्य मंदिरातील गाभाऱ्यात कुलदैवत खंडेरायाचा विधिवत पाकाळणी हा धार्मिक विधी करण्यात येतो. (
मुख्य गाभारा स्वच्छ धुवून मार्तंड भैरव मूर्तींसह खंडोबा म्हाळसादेवी या जोड मूर्तींना नवे पोशाख परिधान करण्यात येऊन विधिवत पूजा अभिषेक करणे याला पाकाळणी असे म्हणतात) बुधवारी (दि.22) पहाटेची नित्य पूजा अभिषेक भूपाळी आरती झाल्यानंतर सकाळी 8 वाजता पाकाळणी विधीस प्रारंभ करण्यात आला.
गाभारा स्वच्छ धुवून मुख्य मार्तंड भैरव मूर्तींसह खंडोबा म्हाळसादेवी गाभाऱ्यातील सर्व मूर्तींना नवे पोशाख परिधान करण्यात आले. दवणा-फुले वाहण्यात आली. मराठी नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडव्याचे प्रतीक साखरेच्या गाठीचे हार सर्व मूर्तींना घालण्यात आले. आरती झाल्यानंतर श्रींच्या मुख्य मंदिरासमोर असणाऱ्या बगाड या ठिकाणी मानाची गुढी उभारण्यात आली.