घोडेगाव – श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसरात विविध विकासकामे चालू असल्याने यात्रा काळात भाविकांनी प्रशानास सहकार्य करावे, असे आवाहन प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर यांनी केले. घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे आंबेगाव तालुका तहसील कार्यालयात शनिवारी (दि. 18) फे ब्रुवारी रोजी होणाऱ्या महाशिवरात्री यात्रेच्या अनुषंगाने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रांतअधिकारी कोडोलकर बोलत होते.
यावेळी समाजकल्याण विभागाचे माजी सभापती सुभाष मोरमारे, तहसीलदार रमा जोशी, नायब तहसीलदार अनंता गवारी, दामुराजे असवले, तुषार कोरडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुरेश पठाडे, ए. एस. चासकर, पोलीस निरीक्षक व्ही. बी. चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, आरोग्य विभागाचे डी. बी. जाधव,
सुरेश लव्हांडे, एसटी महामंडाळाचे अधिकारी एस. आर. काळे, देवस्थान अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे, विश्वस्त मधुकर गवांदे, आशिष कोडीलकर, गोरक्ष कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, सरपंच दत्तात्रय हिले यांसह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
भीमाशंकर परिसर विकास आराखड्यांतर्गत खरेदी करण्यात आलेल्या एसटी महामंडळाच्या मिनीबस फक्त श्रावण महिना आणि महाशिवरात्री यावेळी उपलब्ध होत आहेत. इतर वेळी भाविकांना वाहनतळ ते मंदिरापर्यंत पायपीट करत मानसिक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शनिवार, रविवार आणि इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी सहा मिनिबस वाहनतळ ते मंदिरापर्यंत उपलब्ध पाहिजे, असे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सूचना मांडली.
कोंढवळ फाटा ते मंदिरापर्यंत पथदिवे लावावेत, पुरातत्व विभागाने मंदिर परीसरातील आणि इतर ठिकाणचा राडारोडा उचलावा, सुलभ शौचालयाने येणाऱ्या भाविकांकडून माफक दरात पैसे घ्यावेत, यात्रा काळात पीएमपीएलच्या बसेस उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी सुभाषराव मोरमारे यांनी केली.
व्हीआयपी मार्गावरून दर्शनबारी
श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे नवीन पायरीमार्गाचे काम चालू असल्याने भाविकांसाठी व्हीआयपी रस्त्यावरून दर्शनबारी सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे व्हीआयपी मार्ग बंद आहे. व्हीआयपी व्यक्तींना बसस्थानकापासून अर्धा किलोमीटर मंदिरापर्यंत भाविकांच्या रांगेतून पायी जावे लागणार असल्याने भाविकंनी यात्रा काळात प्रशासनास व भीमाशंकर देवस्थान संस्थानला सहकार्य करावे आणि याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने दक्षता घ्यावी.