शिक्रापूर -कोरेगाव भीमासह पेरणे येथे एक जानेवारी शौर्यदिनी ऐतिहासिक विजय रणस्तंभास मानवंदना देण्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी जोरात सुरू आहे. तर आता विजय रणस्तंभ सजावटसाठी रणस्तंभ पाण्याच्या सहाय्याने धुवून घेत सजावटीची सुरुवात करण्यात आली आहे.
75 फुटी ऐतिहासिक विजय रणस्तंभ कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फुलांसह विद्युत रोषणाईने आकर्षक पद्धतीने सजविण्यात येत आहे. तर शौर्यदिनाच्या कार्यक्रमास अवघे दोन तीन दिवस उरले असताना आता येथील विजयस्तंभाच्या सजावटीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या माध्यमातून अग्निशमक बंबाच्या पाण्याच्या सहाय्याने स्तंभ धुवून स्वच्छ करत सटावटीच्या तयारीस सुरुवात करण्यात आली आहे. तर लवकरात लवकर सर्व कामे मार्गी लावून सजावटीसाठी तयारी करण्यात येणार असून या वर्षी विजयस्तंभ फुलांनी सजवत स्तंभ परिसरात आकर्षक सजावट करण्यात येणार असल्याचे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.