– राजेंद्र काळभोर
लोणी काळभोर – येथील पोलीस ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीतून निघून शहर पोलिसांच्या ताब्यात येऊन दोन वर्षे होत आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळाअभावी शहर पोलिसांना अद्याप कामाचा ठसा उमटवता आला नाही. हवेली तालुक्यातील लोणी काळभोर पोलीस ठाणे यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली होते. तत्कालीन राज्य सरकारने लोणी काळभोर ठाणे हे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली आणले. मात्र, आवश्यकतेनुसार मनुष्यबळ पुरवण्यात न आल्याने पोलीस ठाण्याची कामगिरी मात्र, तोळामासाच राहिली आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सध्या 21 गावे आहेत. या गावांमध्ये कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. पुणे शहराजवळ असलेल्या आणि ग्रामीण कूस बदलून शहरी तोंडवळा लाभलेल्या या गावांमध्ये गुन्हेगारीचा आलेख उंचावत आहे. लोणी काळभोर ठाण्याअंतर्गत उरूळी कांचन, थेऊर व उरुळी देवाची या तीन ठिकाणी पोलीस चौकी आहेत. तीनही चौक्यांच्या माध्यमातून या गावातील कारभार हाकला जात आहे. मात्र तरीही गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने मनुुष्यबळ अपुुुरे पडत आहे.
लोकसंख्या वाढली, पण कर्मचारी जैसे थे
सध्या लोणी काळभोर परिसरात लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात मनुष्यबळ तोकडे पडत आहे. साधारण 150 कर्मचाऱ्यांची गरज आहे. पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे. शहरीकरण, रस्त्याच्या समस्या, संवेदनशील भाग आदी कारणांमुळे पोलिसांना कमी मनुष्यबळात जादा काम करावे लागत आहे. पुणे शहरात असणाऱ्या इतर ठाण्यात दाखल गुन्ह्यांचे आणि लोणी काळभोरमधील गुन्ह्यांचे प्रमाण सारखे आहे. मात्र, तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. हद्दीतील गावांच्या लोकसंख्येत वाढ होत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.
तीनच बीट मार्शल उपलब्ध
पुणे शहरातील कुठल्याच पोलीस ठाण्यात 125 पेक्षा कमी कर्मचारी नाहीत. फक्त लोणी काळभोर पोलीस ठाण्यातच कर्मचारी 100 पेक्षा कमी आहेत. पोलीस ठाणे पुणे शहरात आल्यानंतर सुरवातीला 107 कर्मचारी होते. परंतु बदली झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन कर्मचारी बदलून न आल्याने ही संख्या आता 90 झाली आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन राष्ट्रीय महामार्ग व दोन लोहमार्ग जातात. या महामार्गावर सतत अपघात होतात. पोलीस ठाण्याची एकूण हद्द 207 चौरस किलोमीटर आहे. शहरातील कुठल्याच पोलीस ठाण्याची हद्द एवढी मोठी नाही. एवढ्या मोठ्या हद्दीत सहा बीट मार्शलची गरज आहे. परंतु सध्या तीनच बीट मार्शल उपलब्ध आहेत.
तीन गावांत सुव्यवस्था रामभरोसे
2011च्या जनगणनेनुसार लोणी काळभोर हद्दीतील लोकसंख्या 1 लाख 43 हजार आहे. 2021ची जनगणना झाली नाही. गेल्या 12 वर्षात ही लोकसंख्या तिप्पट झाली असावी असा अंदाज आहे. एकट्या उरुळी कांचन ग्रामपंचायतीची लोकसंख्या एक लाख झाली आहे. लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायतींची मिळून एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या झाली आहे.
वाहनांची संख्या तोकडी
सध्या चारचाकी 4 वाहने उपलब्ध असून कमीत कमी 5 चारचाकी वाहनांची गरज आहे. पुणे शहरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री या सारख्या व्हीआयपी लोकांची सतत वर्दळ असते. पुणे शहरात कुणीही व्हीआयपी येणार असेल तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात असलेल्या तुटपुंज्या मनुष्यबळातुन ऍडजेस्टमेंट करुन 15 ते 20 कर्मचारी बंदोबस्तासाठी द्यावे लागतात.
चार लाख लोकसंख्येचा भार
लोणी काळभोर पोलीस ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत असताना 10 आधिकारी व 80 पोलीस कर्मचारी कामावर हजर असत. तीस वर्षापूर्वीच्या लोकसंख्येच्या आधारावर एवढे मनुष्यबळ उपलब्ध होते. आता पोलीस ठाणे शहरात आल्यानंतर फक्त थोडासाच बदल झाला आहे. सध्या पोलीस ठाण्यात 14 आधिकारी व 90 कर्मचारी कामावर हजर असतात. या कर्मचाऱ्यांच्या जीवावर 21 गावातील अंदाजे चार लाख लोकसंख्या अवलंबून आहे. येथे साधारण 150 कर्मचाऱ्यांची गरज आहे.