पुणे – महापालिकेच्या तब्बल 18 हजार कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करण्यात आला असून त्यांना वेतन आयोगाचा फरक देण्यासही प्रशासनाने मान्यता दिली आहे. मात्र, अद्याप वेतन आयोगाचा फरक देण्यात आलेला नाही. 31 मार्च अखेर महापालिकेस मिळणारे उत्पन्न आणि पालिकेकडे सादर झालेल्या खर्चाचा बिलाचा आढावा घेऊन येत्या काही दिवसांत शिल्लक राहणाऱ्या निधीतून पालिका कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा फरक देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
फरकाचा पहिला हप्ता देण्यासाठी सुमारे 180 कोटींची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात ही फरकाची रक्कम मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या निर्णयाचे स्वागत महापालिका कर्मचाऱ्यांनी केले आहे.