पुणे – उरळी कांचन येथील गोल्ड बॉय म्हणून प्रसिध्द असलेल्या मोनू बडेकर याला एका सराईत गुन्हेगाराने गंडा घातला आहे. त्याच्याशी दोस्ती करुन प्रथम त्याची 18 तोळ्याची सोनसाखळी वापरण्यास घेतली. यानंतर सोन साखळी परत न देता, ती चोरीची असल्याचे पोलिसांना सांगेन असा दम भरत तब्बल दोन लाखाची खंडणी उखळली. दरम्यान त्याची सोशल मिडियावर बदनामीही केली.
याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मोनु बाळासाहेब बडेकर (30, रा.तुपे वस्ती, उरळी कांचन) यानी दिलेल्या तक्रारीनूसार महेश उर्फ मल्लाप्पा साहेबान्ना होसमानी (31,रा.लोणी काळभोर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मोनुचा परिवार शेतकरी आहे. तर त्याला इंन्सटाग्रामवर रिल्स करण्याचा छंद आहे. त्याचे साडेचार लाख फॉलोअर्स आहेत. त्याची 2021 मध्ये महेश होसमानी याच्याबरोबर ओळख झाली होती.
महेशने मोनुला “मी तुमचे इंन्टाग्रामवरील रिल्स पाहत असून, तुमचा खुप मोठा फॅन असल्याचे सांगितले’. यानंतर त्यांच्यात ओळख वाढून मैत्री झाली. त्यानंतर महेश वारंवार मोनुच्या आईच्या जनसंपर्क कार्यालयात त्याची भेट घेत होता. दरम्यान 15 सप्टेंबर 2023 रोजी महेशने त्याच्या सासरवाडीत एक कायर्क्रम आहे, त्यासाठी एक दिवस वापरायला मोनूकडे सोन्याची चेन मागितली. मोनुने 18 तोळे सोन्याची चेन महेशला दिली. मात्र दुसऱ्या दिवशी तो चेन परत घेऊन आला नाही. मोनुने त्याला फोन केला असता, चेन 20 हजाराच गहाण ठेवली असून ती सोडवण्यासाठी 20 हजार गुगल पेवर घेतले.
मात्र सहा महिने होऊनही महेशने सोन्याची चेन परत केली नाही. अखेर मोनुने त्याच्या घरी जाऊन सोन्याची चेन मागीतली असता, महेशने माझ्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून, मी तुला चोरीचे सोने दिले असल्याचे सांगुन गुन्ह्यात अडकवणी असा दम भरला. तसेच ‘तु खुप मोठा रिल्स स्टार समजतो ना, बघ तुझी कशी सगळी हवा काढतो..तु आताच्या आता मला तीन लाख रुपये दे, अन्यथा तुझी सोशल मिडियावर बदनामी करेल’, असे म्हणत खंडणीची मागणी केली.
दरम्यान, महेशने बदनामीकारक व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर टाकला. बदनामीच्या भितीने मोनुने दोन लाख दिले तसेच सोन्याची चेनही परत घेतली नाही. मात्र महेशकडून पैशाची मागणी वाढू लागल्याने मोनुने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख करत आहेत.