पुणे :– पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या तर्फे पीएमडीटीए मानांकन ओम दळवी मेमोरियल टेनिस स्कूल ब्रॉन्झ सिरिज स्पर्धेत नीव गोजिया याने मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का दिला.
महाराष्ट्र पोलीस टेनिस जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात तिसऱ्या फेरीत नीव गोजियाने सातव्या मानांकित किशल्या शर्माचा 6-2 असा सहज पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. अव्वल मानांकित नीरज जोर्वेकरने पंधराव्या मानांकित रोहन बोर्डेचा टायब्रेकमध्ये 6-5(1) असा संघर्षपूर्ण पराभव केला.
आठव्या मानांकित अंशुल पुजारी व तेराव्या मानांकित अनिश वडनेरकर यांनी अनुक्रमे अरित्रा भट्टाचार्य व चिन्मय ठाकरे यांचा 6-1 अशा सारख्याच फरकाने पराभव केला. तिसऱ्या मानांकित सर्वज्ञ सरोदेने सोळाव्या मानांकित पार्थ दाभिकरचा 6-1 असा एकतर्फी पराभव केला.