पुणे – प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनांच्या सुनावणी अहवाल सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आणखी मुदतवाढ द्यावी, अशी महापालिकेने केली आहे. आयोगाने यापूर्वी हा अहवाल सादर करण्यास महापालिकेस 3 दिवसांची मुदतवाढ दिली होती. त्यानुसार ही मुदत 5 मार्च रोजी संपत आहे. मात्र, आयुक्तांसह महापालिकेची संपूर्ण यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 6 मार्चच्या पुणे दौऱ्याच्या नियोजनात आहे. त्यामुळे प्रभाग रचनेतील बदलांचा अंतिम अहवाल अद्याप तयार झालेला नाही. त्यामुळे ही मुदतवाढ मागण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर महापालिकेस मुदतवाढ मिळाल्यास अंतिम प्रभाग रचनेची मुदत आठवडाभराने पुढे जाणार आहे.
महापालिका निवडणुकांसाठी आयोगाकडून प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती. तर त्यावर 14 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. तर सुमारे 3,596 हरकती आल्या होत्या. या सुनावणीसाठी “यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या हरकतींची सुनावणी दि. 24 ते 26 फेब्रुवारीदरम्यान झाली. त्याचा अहवाल 2 मार्च रोजी सादर करण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. अहवालास वेळ लागणार असल्याने महापालिकेने मुदतवाढ मागितली होती. ही मुदत 5 मार्च रोजी संपत असली, तरी अद्याप अहवाल पूर्ण नसल्याने पालिकेने आणखी मुदतवाढ मागितली आहे. मात्र, अद्याप आयोगाकडून कोणत्याही सूचना आलेल्या नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.