पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांना उपकरणे, साहित्य तसेच सर्व प्रकारची औषधे खरेदी करण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. त्यानुसार पाच लाख रुपये आगाऊ रकमेचा खर्च करण्याचे अधिकारही डॉ. वाबळे यांना देण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे, साहित्य तसेच सर्व प्रकारची औषधांची खरेदी करण्यात येते. दहा लाख आणि पाच लाख रुपयांपर्यंत खरेदीचे अधिकार यापूर्वी महापालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय संचालक आणि वैद्यकीय अधीक्षक यांना प्रदान केले होते, परंतु या अधिकाऱ्यांना दिलेले हे खरेदीचे अधिकार रद्द करण्यात आले.
25 ऑक्टोबर 2021 रोजीच्या आदेशानुसार, नव्याने विभागप्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यानुसार, वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे यांना विभागप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. स्थायी अग्रीम धनाची पाच लाखांची रक्कम खर्च करण्याचे अधिकार अधिष्ठाता यांच्या नावाने करण्यात येणार आहे.