पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ठ झालेल्या ३४ गावांमधील, प्राधिकरणाच्या ताब्यात असलेले सुविधा भूखंड (अॅनेमिटी स्पेसेस) आणि रस्ता रुंदीकरणाचे क्षेत्र महानगरपालिकेच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार १३ गावांमधील ४५ जागा रस्त्यांसाठी पालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे.
याचे एकूण क्षेत्र ७२ हजार ५६० चौ.मी. इतके आहे. तर ताब्यात भूखंडाची संख्या ३६ असून त्याचे क्षेत्र १ लाख १३ हजार ५६४ चौ. मी. इतके आहे. या जागा पालिकेच्या ताब्यात आल्याने महानगरपालिकेला सोयीसुविधांचा विकास करता येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी दिली.
मुळशी तालुक्यातील सूस, म्हाळुंगे, बावधन बु. आणि हवेली तालुक्यातील फुरसुंगी, मांजरी बु, मुंढवा, उंड्री, किरकटवाडी, आंबेगाव बु, आंबेगाव खु, औताडे हांडेवाडी, लोहगाव आणि वाघोली येथील गावांमधील जागा रस्त्यांसाठी देण्यात आल्या आहेत.