पुणे : सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिराजवळ असलेल्या एका दुचाकी विक्री दालनात आग लागल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी लागलेल्या या आगीत २० ते २५ दुचाकी जळाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्धा तासात आग आटोक्यात आणली.
नवशा मारुती मंदिराजवळ टीव्हीएस शोरुम दुचाकी विक्री दालन आहे. गुरुवारी (५ ऑक्टोबर) सकाळी पावणेआठच्या सुमारास दुचाकी विक्री दालनात आग लागली. त्यानंतर काही क्षणात ही आग भडकली. या घटनेत दुचाकी विक्री दालनातील २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर, प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन आग अर्धा तासात आटोक्यात आणली. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली? यामागचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.