व्हायरल व्हिडिओनंतर पीएमपी प्रशासनाची कारवाई
पुणे : मोबाइलवर व्हिडिओ बघत बस चालविणाऱ्या कर्मचाऱ्याला पीएमपीने निलंबित केले आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर चालकाचा शोध घेत ही कारवाई करण्यात आली. संबंधित चालक भोसरी डेपो बस ठेकेदाराकडील असल्याचे सांगण्यात आले आहे.
ही माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली. रविवारी सायंकाळी पीएमपी बसचा एक चालक मोबाइलवर सिनेमा पाहत बस चालवित असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
मात्र, ही बस कोणत्या मार्गावरील होती, हा प्रकार कोठे घडला याची माहिती नव्हती. मात्र, चालकाचा चेहरा दिसत होता. प्रशासनाने अधिकारी तसेच डेपोंमध्ये हा व्हिडिओ पाठवत तपास केला. त्यावेळी हा बसचालक ठेकेदाराकडील असल्याचे समोर आले.
प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा कोणालाही अधिकार नाही. यापुढे बस चालविताना फोन बघणे, फोनवर बोलणे, फोनचा वापर करणे असे प्रकार घडू नयेत, यासाठी संबंधितांना सक्त ताकीद दिली आहे. असे प्रकार घडल्यास सर्वांवर जबाबदाऱ्या निश्चित करून कडक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
– ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी