बाजार समितीचा निर्णय विक्रेत्यांना न परवडणारा बंद व्यवसाय सुरू करण्याची मागणी
4 जानेवारीपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
पुणे – बाजार समितीने शिवनेरी रस्त्यावरील फळविक्रेत्यांना अवाजवी भाडे आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तो त्या विक्रेत्यांना परवडणारा नाही. विक्रेते रितसर आणि रास्त भाडे देण्यास तयार आहेत. त्यासाठी निकष ठरवून घेण्याची आमची तयारी आहे. मात्र, आमचा बंद झालेला व्यवसाय सुरू करावा. अन्यथा येत्या 4 जानेवारीपासून बाजार समितीसमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा पथारी व्यावसायिक पंचायतीचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी दिला.
यावेळी सरचिटणीस बाळासाहेब मोरे, कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांच्यासह पथारी व्यावसायिक उपस्थित होते.
डॉ. बाबा म्हणाले की, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शिवनेरी रस्त्यावर आमचे सभासद अनेक वर्षांपासून फळविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. सुरुवातीला रस्त्याच्या दक्षिण बाजुला फुटपाथवर व्यवसाय करीत होते. त्यानंतर आम्ही पूनर्वसनाची मागणी केल्यानंतर बाजार समितीने सध्याच्या जागेवर व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. या जागेवर 16 वर्षांपासून व्यवसाय करीत आहेत.
मात्र, गेल्या महिन्यात बाजार समितीने अतिक्रमण कारवाई केली. त्यानंतर प्रतिदिन 590 रुपये भाडे भरावे लागेल, असे प्रशासकांनी सांगितले. हे भाडे न परवडणारे आहे. रास्त व न्याय निकष ठरवून भाडे आकारावे, अशी आमची मागणी आहे. याप्रकरणी पालकमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली आहे. सद्य:स्थितीत व्यापार बंद असल्याने उपासमार होत असून व्यवसाय पूर्ववत सुरू व्हावा, अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे म्हणाले, बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी 590 रुपये भाडे भरावे लागेल, अशी भूमिका घेतली. मात्र, आता ते 400 रुपये भरावे, असे सांगत आहेत. शिवनेरी रस्त्याच्या बाजूला फळविक्रेते व्यवसाय करत असलेली जागा खरेच बाजार समितीची आहे का, याची पाहणी करावी.
“शिवनेरी रस्ता बाजार समितीच्या मालकीचा’
मुख्य शिवनेरी रस्ता पूर्णत: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीचा आहे. रस्त्याच्या उतरेकडील पेट्रोल पंपासमोरील जागा ही बाजार समितीच्या मालकीची आहे. बाजार समितीच्या पुणे महापालिकेने मंजूर केलेल्या आराखड्यात या जागेचा समावेश असून, ती जागा बाजार समितीची असल्याचे स्पष्ट आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे पुणेचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.