पुणे – निसर्गाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुण्यातील माजी सैनिकाने एक अनोखा उपक्रम राबविला. माजी सैनिक रमेश खरमाळे आणि त्यांच्या पत्नी स्वाती यांनी जुन्नर येथील धामणखेल डोंगर माथ्यावर 60 दिवसांत 70चर खणले. या चरामध्ये पावसाचे 8 लाख लीटर पाणी साठविण्याची क्षमता असून यामाध्यमातून तब्बल 500 झाडे लावली जाऊ शकतात.
खरमाळे यांनी आपला 46वा वाढदिवस साजरा करताना निसर्गला एक भेट द्यावी, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला होता. दि. 15 सप्टेंबर 2021 मध्ये सुरवात केलेल्या या उपक्रमांतर्गत खरमाळे दररोज सकाळी 5:30 ते 9:30 पर्यंतच म्हणजे 4 तास काम करायचे व नंतर शासकीय कामावर हजर रहायचे. या सातत्यपूर्ण श्रमदानाच्या 60व्या दिवशी तब्बल 300 तासांच्या अथक प्रयत्नांनी 412 मीटर लांबीचा चर निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले.
याबाबत खरमाळे म्हणाले की, गेली 45 वर्षे ज्या निसर्गाने श्वास देत जगवल त्याच ऋण याच जन्मी फेडावे म्हणून हा उपक्रम हाती घेतला होता.
या कार्यात माझी पत्नी स्वाती हिने महत्वपूर्ण साथ दिली. हे काम करताना खूप त्रास झाला, कारण खोदकाम करून पुन्हा माती काढायला पत्नीला मदत करावी लागत होती. हातांना खूप फोड आले परंतु, कामास व्यत्यय नको म्हणून हातात ग्लोज घालून काम चालू ठेवले. शेवटी हातावर येणाऱ्या फोडांनी पण माझ्या जिद्दीपुढे हाथ टेकले. पुढे या दिवसांत साधा खोकल्यासारखा आजारही आला नाही.
या उपक्रमाद्वारे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच भविष्यात अशा प्रकारे वाढदिवस साजरा करणारी माणसं घडावी व निसर्गाचे जतन व जैवविविधतेला त्याचा फायदा होईलच व तेथील स्थानिक शेतकरी बांधवांना शेतीसाठी मदत मिळावी, अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.