सहकार नगर (हर्षद कटारिया) – महानगरपालिकेच्या विद्युत विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सहकारनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलचे 10 लाख 75 हजार वीजबिल थकले आहे. या संकुलाचा वीजमीटर बंद असताना वीजप्रवाह मात्र सुरू असल्याने महावितरणच्या कामाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नमस्कार प्रतिष्ठान तर्फे करण्यात आली आहे.
सामान्य नागरिकांचे तीन महिन्यांचे वीजबिल थकल्यानंतर महावितरणकडून वीजेचे कनेक्शन कट केले जाते. परंतु, सहकारनगर येथील क्रीडा संकुलचे गेल्या अनेक वर्षाचे लाखो रुपयांचे वीजबिल थकीत असताना वीज पुरवठा सुरू कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे.
सहकानगर येथील क्रीडा संकुलाचा ताबा नक्की कोणाकडे आहे, येथे जीम सुरू करून त्याचे घेतलेले मासिक शुल्क नक्की कोणाच्या खिशात जाते, अशा भ्रष्टाचाराबाबत “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच सदर संकुलाला पालिकेने कुलुप लावले होते. तसेच, संकुल भाडेतत्वावर देण्याबाबत निविदा प्रक्रिया सुरू केली होती.
परंतु, या संकुलात गेल्या काळात जिम, विविध सोहळे, मेजवाण्या, क्लासेस असे कार्यक्रम झाले त्याचे भाडे कोणी घेतले याची माहिती पालिका अधिकाऱ्यांना नाही, त्यातच लाखो रुपयांचे वीजबील थकल्याची बाब समोर आली आहे. आता, हे वीजबील नेमके कोण भरणार? असा सवाल नमस्कार प्रतिष्ठान तर्फे करण्यात आला आहे.
सदर क्रीडा संकुलातील वीज मिटर दिनांक 25/03/2013 मधील असून हा मीटर बंद असून वीज प्रवाह मात्र सुरू असला तरी गेल्या 9 वर्षांत एकदाही वीजबील आलेले नाही. महानगरपालिका आणि महावितरणचा हा संयुक्त कारभार आहे. आता, वीजबीलाची वसुली जनतेच्या पैशातून करू नये. ज्यांनी या संकुलाचे भाडे ज्यांनी घेतले त्यांच्याकडून ते वसूल करावे.
– निखिल शिंदे, नमस्कार प्रतिष्ठान, अध्यक्ष
सहकारनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलचे थकीत वीजबील शुक्रवारी महानगरपालिकेकडे पाठविण्यात आले असून बील भरले नाही तर वीज पुरवठा बंद करण्यात येईल.
– राजेश बिजवे, कार्यकारी अभियंता, महावितरण